कुरार दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६; आंबेडकरनगरमध्ये ३६ तासांनी आढळले ३ मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:53 AM2019-07-04T04:53:10+5:302019-07-04T04:53:25+5:30

घटनास्थळावरील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बुधवारी सुरू असतानाच आंबेडकरनगर येथे ढिगा-याखाली तीन मृतदेह आढळले.

26 killed in the kurar accident; 3 bodies found in 36 hours in Ambedkar Nagar | कुरार दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६; आंबेडकरनगरमध्ये ३६ तासांनी आढळले ३ मृतदेह

कुरार दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६; आंबेडकरनगरमध्ये ३६ तासांनी आढळले ३ मृतदेह

Next

मुंबई : मालाड पूर्वेकडील कुरार येथील पिंपरी पाडा, आंबेडकरनगर येथे संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा बुधवारी २६ झाला आहे. घटनास्थळावरील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बुधवारी सुरू असतानाच आंबेडकरनगर येथे ढिगा-याखाली तीन मृतदेह आढळले. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. मृत तिघेही मूळचे बार्शी येथील होते. तर विविध रुग्णालयांत दाखल जखमींचा आकडा ७२ झाला असून, २३ जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी रात्री घटना घडल्यानंतर मंगळवारी सर्व लक्ष पिंपरी पाड्याकडे देण्यात आले. याचवेळी आंबेडकरनगरकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले. घटनेच्या ३६ तासांनंतर आंबेडकरनगरमध्ये मृतदेह आढळल्याने स्थानिकांनी रोष व्यक्त केला.
सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास येथील संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. बुधवारीदेखील येथील बचावकार्य सुरूच होते. मंगळवारी दुर्लक्षित राहिलेल्या आंबेडकरनगरमधील ढिगारा उपसण्याचे काम स्थानिक आणि मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बुधवारी हाती घेतले. आंबेडकरनगर येथील उर्वरित संरक्षक भिंतही पाडण्यात आली.
संरक्षक भिंत कोसळून पावसाच्या पाण्याचा मारा आंबेडकरनगर येथील झोपडपट्ट्यांनाही बसला. येथील १०० हून अधिक घरे वाहून गेली. रात्रीची वेळ असल्याने कुटुंबातील प्रत्येक जण झोपेत असताना दुर्घटना घडली. त्यामुळे लोकांना बचावासाठी वेळ मिळाला नाही. बुधवारी येथे ढिगारा उपसण्याचे काम सुरू असताना स्थानिकांना तीन मृतदेह सापडले. यात एक महिला आणि दोन व्यक्तींचा समावेश होता. ढिगाºयाखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी हाती घेतले. परंतु बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बचाव कार्यामध्ये अडथळा येत होता.
रहिवासी प्रतिका तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, दुर्घटनेच्या दिवसापासून माझी नातलग बेपत्ता झाली आहे. ज्या वेळी दुर्घटना घडली तेव्हा तिचा मुलगा मकरंद हा कामावर गेला होता. आपली आई बेपत्ता झाली असे मकरंदला समजल्यापासून तो रुग्णालयात खेपा घालत आईचा शोध घेत आहे. दुर्घटनेच्या दुसºया दिवशी तुटलेल्या झोपड्या पाडत असताना मृतदेह आढळले. त्यामध्ये एक महिला असून ती मकरंदच्या आईसारखी दिसतेय अशी चर्चा स्थानिकांमध्ये होती. मात्र यास दुजोरा मिळालेला नाही.

- जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ११ जणांवर उपचार सुरू आहेत. २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ५३ जणांवर उपचार सुरू आहेत. २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- मालाड येथील एम. व्ही. देसाई रुग्णालयात दाखल २ जणांचा मृत्यू झाला आहे.
- अंधेरी येथील कूपर रुग्णालयात दाखल ६ जणांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून, ३ जणांची प्रकृती स्थिर आहे.
- परळ येथील केईएम रुग्णालयात २ जण दाखल आहेत.
- एकूण १२१ पैकी २६ जणांचा मृत्यू झाला. ७२ जणांवर उपचार सुरू आहेत. २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

स्थानिकांकडून मदत
बेघर झालेले रहिवासी आपल्या संसाराची जमवाजमव करत होते. संपूर्ण संसार पाण्यात वाहून गेला आहे. या वेळी बेघरांसाठी कांदेपोहे व बिस्किटांची व्यवस्था स्थानिकांनी केली होती.

मालाडकरांचा वाढता रोष
आंबेडकर नगर येथे १०० हून अधिक झोपड्या वाहून गेल्या. कित्येक लोक बेपत्ता व मृत्युमुखी पडले. तरीसुद्धा कोणीही आंबेडकरनगरवासीयांची दखल घेतली नाही. सरकारने राहण्याची व्यवस्था केली नाही. बेघरांना शेजारपाजारच्या रहिवाशांनी आसरा दिला आहे, असे येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

Web Title: 26 killed in the kurar accident; 3 bodies found in 36 hours in Ambedkar Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.