गणेशमूर्ती विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव! निर्माल्यापासून बनवणार खत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:56 IST2025-07-24T12:56:08+5:302025-07-24T12:56:30+5:30
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास केलेली मनाई उच्च न्यायालयाने उठविल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार झाल्या आहेत. ...

गणेशमूर्ती विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव! निर्माल्यापासून बनवणार खत
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास केलेली मनाई उच्च न्यायालयाने उठविल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार झाल्या आहेत. दुसरीकडे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यंदा २२५ ते २५० पर्यंत कृत्रिम तलाव बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे. मागील वर्षी या तलावांची संख्या २०६ इतकी होती.
कृत्रिम तलावांत पाच फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचे विर्सजन करता येत नाही. तलावाची खोली वाढवण्यास मर्यादा असल्याने पाच फुटांपर्यंतच्या मूर्तींचे या तलावात विसर्जन होते, अशी महापालिकेची भूमिका कायम आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी पालिकेने शाडूच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. मागील वर्षी या मातीपासून मूर्ती बनवण्यासाठी २०० पेक्षा जास्त मूर्तिकारांना ५०० टन माती मोफत देण्यात आली होती. यंदा जवळपास ९०० टन माती देण्यात आली आहे. पेण, पनवेल या भागातून मोठ्या प्रमाणावर मूर्ती मुंबईत येतात. तेथील मूर्तिकारांना शाडूची माती देण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत पालिकेने पत्रव्यवहार केला आहे.
निर्माल्यापासून खत
निर्माल्य संकलनासाठी पालिका ठिकठिकाणी कलश ठेवते. त्यात जमा झालेल्या निर्माल्यापासून खत तयार केले जाते. हे खत मुंबईतील विविध उद्यानांमध्ये वापरले जाते. मागील वर्षी ५०० मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले होते. कलशाची व्यवस्था केली जात असल्याने निर्माल्य समुद्र, तलावांत जात नाही.