सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 02:02 IST2025-05-12T02:01:29+5:302025-05-12T02:02:03+5:30

सायकल ट्रॅक उभारण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना पुढाकार घेतला होता.

25 crore spent in bkc to demolish cycle track contractor appointment process underway | सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले तब्बल ९.९० किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक आता काढून टाकण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने रस्ता रुंदीकरण करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रियाही सुरू केली आहे.

बीकेसीत तब्बल १०.८ किमी पदपथ आहेत. त्यालगत ९.९ किमी लांबीचे सायकल ट्रॅकही उभारण्यात आले आहेत. यातील पदपथांची रुंदी ४ ते ७ मीटरपर्यंत, तर सायकल ट्रॅक १.५ ते २.७ मीटर रुंदीचे आहेत. मात्र, दरदिवशी बीकेसीत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या ६ लाखांवर पोहोचल्याने गर्दीच्या वेळेत येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला लिंक रोडवर कलानगर जंक्शनपासून भारत डायमंड बोर्सपर्यंत कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. बीकेसी कनेक्टरच्या सुरुवातीलाही काही प्रमाणात कोंडीचा प्रश्न आहे. या परिस्थितीतच सायन पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने ती वाहतूकही आता बीकेसीतून वळविली जाते आहे. 

अवजड आणि अन्य वाहने बीकेसी कनेक्टरचा वापर करत असल्याने त्यांचीही कोंडीत भर पडते आहे. सायकल ट्रॅक उभारण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना पुढाकार घेतला होता.

हा फायदा होणार 

सायकल ट्रॅक काढल्याने सध्याच्या २ मार्गिकांमध्ये आणखी एका मार्गिकेचा समावेश होणार आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात सुमारे ५० टक्के वाढ होईल. यामुळे गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल, तर सिग्नल किंवा अरुंद जागांवर प्रतीक्षा वेळ १० मिनिटांवरून ७ मिनिटांपर्यंत कमी होईल. त्यातून कार्बन उत्सर्जनदेखील ३० टक्क्यांनी कमी होईल. 

तीन मार्गिकांचा रस्ता

बीकेसीतील अंतर्गत दळणवळण सुरळीत करण्यासाठी, तसेच कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था लागू केली जाणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएच्या बैठकीत सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन मार्गिकांचा रस्ता आता तीन मार्गिकांपर्यंत वाढणार आहे. त्यातून प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता ६०० ते ९०० वाहनांनी वाढण्याची अपेक्षा एमएमआरडीएचे अधिकारी व्यक्त करत आहेत. 

काय बदल होणार?(लांबी मीटरमध्ये)

सध्याचा दोन्ही बाजूंचा रस्ता    सायकल ट्रक    बदलानंतरची स्थिती
१४    ५.४    १९.४ 
१४    ३    १७ 
७    ३    १०

 

Web Title: 25 crore spent in bkc to demolish cycle track contractor appointment process underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.