२४ तास पाण्याचे वचन होते, दिले फक्त ५ तास; काँग्रेसचे महायुतीवर १३ पानी आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:30 IST2025-12-27T09:29:38+5:302025-12-27T09:30:05+5:30
महायुतीने कंत्राटदारांसाठीच केले काम, प्रचारात हेच मुद्दे वापरणार

२४ तास पाण्याचे वचन होते, दिले फक्त ५ तास; काँग्रेसचे महायुतीवर १३ पानी आरोपपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तीन वर्षे नऊ महिने मुंबई महापालिकेवरील प्रशासकाच्या माध्यमातून महायुतीने मुंबईकरांना लुटले आहे. केवळ कंत्राटदार व लाडके उद्योगपती यांना मुंबई विकण्याचे काम केले आहे. मुंबईकरांना २४ तास पाण्याचे वचन दिले, मात्र फक्त ५ तास पाणी मिळते. मुंबई हे भ्रष्ट ‘महायुती काॅर्पोरेशन’ बनले आहे, असा घणाघात मुंबई काँग्रेसने शुक्रवारी महायुतीवर केला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मिठी नदीच्या काठी झालेल्या कार्यक्रमात महायुतीवर १३ पानी आरोपपत्र दाखल केले.
माजी मंत्री आ. अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल, आ. डॉ. ज्योती गायकवाड, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. महायुतीने पालिकेच्या ठेवी लुटल्या. रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाहतूक कोंडी, वायुप्रदूषण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, आरोग्य, शिक्षण या सर्व मुद्द्यांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
जाहीरनामा लवकरच
महापालिकेच्या शाळा खासगी लोकांना दिल्या जात आहेत, असा आरोप गायकवाड यांनी केला. आमचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करणार आहोत; पण महायुतीने काय केले, हे या आरोपपत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आणल्याचे त्यांनी सांगितले.
‘वंचित’चा उल्लेख टाळला
वंचित बहुजन आघाडीसोबत युतीच्या चर्चेची सद्य:स्थिती काय आहे, या प्रश्नावर ‘सचिन सावंत यांना विचारा,’ असे मोघम उत्तर गायकवाड यांनी दिले. वंचित व समविचारी पक्षांशी आमचा संवाद सुरू आहे, एवढेच त्यांनी सांगितले.
आरोपत्रातील मुख्य मुद्दे
२४ तास पाण्याचे वचन, मात्र फक्त ५ तास पाणी
बेस्टचे भाडे १०० टक्के वाढवून मुंबईकरांच्या खिशाला चाट, बेस्टच्या खासगीकरणाचा घाट
१७ हजार कोटींच्या काँक्रीट रस्त्यांचा डंका पिटला; पण ७२३ रस्त्यांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत
धारावी अदानींची, मिठी नदी अदानींची, विमानतळ-बंदरही अदानींचेच; मग मुंबई ‘अदानी सिटी’ झाली तर आश्चर्य कशाचे?
महापालिका रुग्णालयांची प्रचंड दुरवस्था
सार्वजनिक सुरक्षेचा फाटला ढोल, मुंबईत हरवली १४५ मुले
खड्ड्यांमुळे कोणतेही मृत्यू झाले नाहीत, असे महायुतीचे निलाजरे उत्तर
गुजरातच्या प्रेमात मुंबईचे तरुण वाऱ्यावर, महायुतीने रोजगार पळवले.
बिल्डरांच्या फायद्यासाठी मराठी शाळा बंद केल्या.
कचरा संकलनामध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा.