पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात; केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:45 IST2024-12-12T09:45:12+5:302024-12-12T09:45:18+5:30

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली बेस्ट सेवा संकटात आहे. गैरव्यवस्थापनामुळे बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

2160 BEST buses scrapped in five years; Only 37 new buses purchased, revealed | पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात; केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केल्याचे उघड

पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात; केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या पाच वर्षांत बेस्ट उपक्रमाने आयुर्मान संपुष्टात आलेल्या २१६० बस भंगारात काढल्या असून त्याबदल्यात केवळ ३७ नव्या बसगाड्या खरेदी केल्या आहेत. तसेच बेस्टच्या मालकीच्या केवळ १०६१ बस ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यान्वित होत्या, अशी माहिती ‘आरटीआय’मध्ये देण्यात आली आहे. बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा घटला असून भाडेतत्त्वावरील बसची संख्या मात्र वाढत आहे. उपक्रमाकडे स्वमालकीच्या १०१३ बसगाड्या असून भाडेतत्त्वावरील बसची संख्या १९०० आहे.  

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली बेस्ट सेवा संकटात आहे. गैरव्यवस्थापनामुळे बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, नागरिकांना गर्दी आणि बसची दीर्घकाळ प्रतीक्षा याचा त्रास सोसावा लागत आहे.  

बेस्टला हव्यात ३,३३७ बस
बेस्टचा स्वमालकीचा बसताफा कमी होत असल्याने अनेक बस मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे सुमारे ३३ लाख मुंबईकर प्रवाशांसाठी बेस्टला आपला ताफा ३,३३७ करणे आवश्यक आहे. बेस्टचे कंत्राट कर्मचारी कमी पगारात काम करतात, हे अर्थसंकटात असलेल्या बसच्या पथ्यावर पडत असले तरी कंत्राटी बसची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने प्रवासात त्या बंद पडून प्रवाशांचे हाल होतात. एसी बसमधील वातानुकूलन यंत्रणाही बंद पडतात.  

... सेवा मिळणे कठीण 
सध्या १५ वर्षांचे आयुर्मान पूर्ण झालेल्या बस भंगारात काढण्यात येत आहेत. त्या तुलनेत नव्या बसची खरेदी मात्र थांबवण्यात आली आहे. बस भंगारात काढल्या गेल्यास ३१ मार्च २०२५ पर्यंत बेस्टचा आकडा ७६१वर येईल. ३० नोव्हेंबर २०२५ नंतर २५१ बस म्हणजे फक्त ८ टक्के बसगाड्या शिल्लक राहतील. त्यानंतर मुंबईकरांना बेस्टची सेवा मिळणे कठीण होईल. 

कोस्टल रोडसारख्या १३ हजार कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते, मात्र सामान्यांच्या सेवेत असलेल्या बेस्ट बसेससाठी सरकार, महापालिकेकडे पैसे नाहीत आणि बेस्ट वाचवण्यासाठी काही करण्याची इच्छाही नाही. यामुळे सामान्य मुंबईकरांचे प्रवासात हाल होतात. 
    - जितेंद्र घाडगे, 
    माहिती अधिकार कार्यकर्ते

Web Title: 2160 BEST buses scrapped in five years; Only 37 new buses purchased, revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट