Mumbai Local Train: प्रवाशांनो लक्ष द्या… मुंबईत आज अन् उद्या तब्बल २१५ लोकल ट्रेन रद्द; कधी अन् कुठे परिणाम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:26 IST2026-01-06T13:26:37+5:302026-01-06T13:26:37+5:30
Western Railway Mumbai Local Train Update: अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

Mumbai Local Train: प्रवाशांनो लक्ष द्या… मुंबईत आज अन् उद्या तब्बल २१५ लोकल ट्रेन रद्द; कधी अन् कुठे परिणाम होणार?
Western Railway Mumbai Local Train Cancelled Today And Tomorrow: कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक सुरू आहे. या ब्लॉकमुळे मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी एकूण २१५ लोकल सेवा रद्द असतील. त्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी होण्याची चिन्हे आहेत. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका जलद मार्गिकला जोडण्यासह अन्य यांत्रिक कामे आज, मंगळवारी मध्यरात्रीनंतर करण्यात येणार आहेत. यासाठी अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेने २० डिसेंबर ते १८ जानेवारीपर्यंत ब्लॉक घेतला आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी अप जलद मार्गावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर १२ ते बुधवारी पहाटे ५.३० आणि डाउन जलद मार्गावर मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ४.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत मंगळवारी अप मार्गावरील ४६ आणि डाऊन मार्गावरील ४७ अशा एकूण ९३ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. बुधवारी ६३ अप आणि ५९ डाऊन अशा १२२ लोकल फेऱ्या रद्द होतील. अशा एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली.
कांदिवली येथे अप जलद मार्गावर पायाभूत सुविधांच्या कामानिमित्त मंगळवारी रात्री मोठा ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉकमुळे पाचव्या मारिकिवरील रेल्वेवाहतुक घांबवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेल्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. रद्द फेऱ्यांमध्ये बारा डब्यांसह १५ डबा आणि एसी लोकलचाही समावेश आहे.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्पातील शेवटचा टप्पा अर्थात कांदिवली ते बोरिवलीदरम्यान यांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०२५ ते १८ जानेवारी २०२६पर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला. यातीलच कामाचा एक भाग म्हणून आज, मंगळवार रात्रीपासून मार्गिका जोडणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
सहाव्या मार्गिकेसाठी ब्लॉक तपशील
| तपशील | वेळ | मार्ग / परिणाम |
| ब्लॉक वेळ (१) | मध्यरात्री १२:०० ते बुधवारी सकाळी ५:३० | अप जलद मार्ग |
| ब्लॉक वेळ (२) | मध्यरात्री १:०० ते बुधवारी पहाटे ४:३० | डाउन जलद मार्ग |
| रद्द फेऱ्या (मंगळवार) | - | ९३ लोकल फेऱ्या |
| रद्द फेऱ्या (बुधवार) | - | १२२ लोकल फेऱ्या |