निरुपयोगी मोबाइल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच; पाच महिन्यांत २१ हजार किलो ई-कचरा संकलित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:44 IST2025-09-28T13:44:13+5:302025-09-28T13:44:34+5:30
मुंबई : निरुपयोगी मोबाइल , चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि इतर उपकरणांच्या तत्सम ई-कचऱ्याचे संकलन करण्यासाठी महापालिकेने विशेष ...

निरुपयोगी मोबाइल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच; पाच महिन्यांत २१ हजार किलो ई-कचरा संकलित
मुंबई : निरुपयोगी मोबाइल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि इतर उपकरणांच्या तत्सम ई-कचऱ्याचे संकलन करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत गेल्या पाच महिन्यांमध्ये २१.५७० हजार किलो ई-कचऱ्याचे संकलन झाले आहे. मुंबईकरांकडून पाच हजार किलो, विविध ठिकाणांच्या गोदामांमधून १० हजार किलो, तर उद्योग क्षेत्रातून सहा हजार किलो कचऱ्याचे संकलन केले आहे. नागरिकांकडे ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असल्याने पालिकेच्या या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत दररोज सुमारे ७ ते ८ दशलक्ष टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाची गरज ओळखून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत २२ एप्रिलपासून घरगुती सॅनिटरीसह अन्य कचऱ्यांचे संकलन सुरू केले आहे.
घातक विषारी घटक
ई-कचरा सर्वसाधारण कचऱ्यात मिसळल्यामुळे त्यातील शिसे (लीड), पारा (मर्क्युरी), कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात आली आहे.
पालिकेच्या क्यूआर कोडद्वारे मिळते माहिती
पालिकेतर्फे क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावरून नागरिकांना ई-कचऱ्याबाबत माहिती देता येते. कचरा संकलनासाठी येणारे कामगार नागरिकांना त्याबदल्यात पैसे देऊन कचऱ्याचे संकलन करतात.
मुंबईत विद्युत उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात दररोज ई-कचरा तयार होतो.
मुंबईकरांकडून अल्प प्रतिसाद
जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज, संगणक यांची विविध संकेतस्थळावर विक्री करून त्याबदल्यात नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे या वस्तू पालिकेला देणे अनेक जण टाळतात. मात्र या कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी पालिका लवकरच पावले उचलणार आहे.