मुंबईत कोरोनाचे २१ नवे रुग्ण, राज्यात दोन बाधिताचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:39 IST2024-01-11T15:36:06+5:302024-01-11T15:39:01+5:30
राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबईत कोरोनाचे २१ नवे रुग्ण, राज्यात दोन बाधिताचा मृत्यू!
मुंबई :
राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये बुधवारी राज्यात एकूण ९८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील २१ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ८४९ आणि मुंबईत १६६कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मालेगाव आणि पुणे येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. तसेच आज १३८ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे २१ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी ३ रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १९ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ७३१ चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - २१
ठाणे मनपा - ५
नवी मुंबई मनपा - १३
कल्याण-डोंबिवली मनपा - ४
मीरा भाईंदर मनपा - १
रायगड - ३