मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 06:13 IST2025-10-31T06:12:59+5:302025-10-31T06:13:43+5:30
गुरुवारीच घडला 'अ थर्सडे' चित्रपटासारखा थरार : बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करत पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई;

मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
मुंबई: 'अ थर्सडे' या चित्रपटाप्रमाणे अपहरणाचा थरार मुंबईत गुरुवारी घडला. ऑडिशनच्या नावाखाली परभणी, लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या १५ वर्षाखालील १७मुलांसह २० जणांना रोहित आर्या (वय ५०) नावाच्या व्यक्तीने पवईच्या प्रसिद्ध आर. ए. स्टुडिओमध्ये ओलिस ठेवल्याच्या घटनेने गुरुवारी खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी बोलण्यात गुंतवून त्याचे एन्काउंटर केले आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली.
गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलने यंत्रणांची झोप उडवली. पवईच्या गजबजलेल्या भागात आर.ए. स्टुडिओ येथे मुलांना एका वेब सिरीजच्या 'ऑडिशन 'साठी बोलावण्यात आले होते. तिथे त्यांना रोहितने ओलिस ठेवले. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. त्यामध्ये एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाच्या बिल्डिंगमध्ये काही लहान मुलांना ओलिस ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पवई पोलिसांसह अन्य यंत्रणांनी नाट्यमयरीत्या ओलिसांना सोडवले.
असा घडला अंगावर काटा आणणारा थरार...
रोहित आर्यासोबत चर्चा सुरू केली. मात्र चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही असे लक्षात येताच, त्याला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या पोलिस पथकाने बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. आतील नागरिकांच्या मदतीने मुलांना सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात करताच आरोपीने एअर गनने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यामध्ये तो जखमी झाला. मुलांची सुखरूप सुटका केल्यानंतर आर्या यास जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. ओलिस ठेवलेल्यांमध्ये १० ते १२ वयोगटातील ९ मुली, ८ मुलांसह २ महिला व १ पुरुष यांचा समावेश होता. पोलिसांनी परिसर सील करून नागरिकांच्या हालचालींवर तात्पुरती बंदी घातली.
कोण होता रोहित? काय होत्या मागण्या?
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या 'पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा'ची २ कोटींहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप रोहित आर्या याने केला होता.
या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत, जाणीवपूर्वक त्याच शाळांची विजेते म्हणून निवड केली, असा गौप्यस्फोटही त्याने केला होता. त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर अनेकदा उपोषणेही केली होती.
सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेबाबत सखोल तपास सुरू आहे. आरोपीकडे एअर गन आणि विशिष्ट प्रकारचे रसायन देखील आढळले आहे. सत्यनारायण चौधरी, सहपोलिस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था