Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेच्या चार वर्षांनी होणाऱ्या महासभेत २७ पैकी २० प्रस्ताव नामांतराचे! संपूर्ण यादी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 07:03 IST

BMC Meeting: बैठकीत शिवसेना-भाजप सत्तेत असताना मुंबईतील एका रस्त्यास 'टिपू सुलतान' नाव देण्याच्या प्रस्तावास भाजपने दिलेल्या पाठिंब्यावरून विरोधी पक्ष भाजपला घेरण्याची शक्यता आहे.

मुंबई : येत्या २५ फेब्रुवारी रोजी तब्बल चार वर्षांनंतर होणाऱ्या पालिकेच्या पहिल्या सभागृह बैठकीत रस्त्यांवरील खड्डे, काँक्रिटीकरण, अतिक्रमणे, पाणीपुरवठा या मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांना अजेंड्यावर मुख्य स्थान मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या पहिल्याच बैठकीत रस्ते आणि पुलांचे नामकरण, नामांतराचा मुख्य अजेंडा सत्ताधाऱ्यांनी हाती घेतल्याचे समोर आले आहे.

या बैठकीत शिवसेना-भाजप सत्तेत असताना मुंबईतील एका रस्त्यास 'टिपू सुलतान' नाव देण्याच्या प्रस्तावास भाजपने दिलेल्या पाठिंब्यावरून विरोधी पक्ष भाजपला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नामकरणाच्या या प्रस्तावांवरून वादंग होऊ शकतो. 

पहिल्या बैठकीत २७पैकी २० प्रस्ताव रस्ते, पूल, चौक आदींच्या नामकरणाचे, नामांतराचे मांडले जाणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी सभागृहात स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा होईल. सभेत २० प्रस्ताव नामांतराचे असून, उर्वरित प्रस्तावांमध्ये तीन प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीबाबत आहेत, तर एक प्रस्ताव पदपथावरील गटई कामगारांना स्टॉल देण्यासंदर्भातील आहे.

वादग्रस्त 'टिपू सुलतान' मार्गाचा प्रस्ताव नाही

मुंबई पालिकेत भाजप व शिवसेनेची सत्ता असताना 'एम- पूर्व' विभागातील एका रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. २०१३ साली स्थापत्य समितीत मांडण्यात आलेल्या या प्रस्तावास सध्याच्या महापौर रितू तावडे आणि भाजपचे अन्य सदस्य यांनी मंजुरी दिली होती.

हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिका सभागृहात मांडण्यात आला तेव्हा अखंड शिवसेनेचे यशोधर फणसे हे सूचक होते, तर सध्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अनुमोदन दिले. याची आठवण करून देत काँग्रेसने भाजपवर पलटवार केला. मात्र, हा प्रस्ताव २५ फेब्रुवारीच्या बैठकीत मांडला जाणार नसल्याचे समजते.

असे आहेत महत्त्वाचे प्रस्ताव

वरळी जलतरण तलावाचे नाव 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव' असे असेल. लालबाग, बॉम्बे गॅस लेन मैदानाचे नाव 'योगेश पाटील मनोरंजन मैदान'

घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावरील पुलाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल'

काळा घोडा येथील चौकाचे नाव 'सायमन पेरेस चौक'

अंधेरी (पश्चिम), निर्मल हॉटेलजवळील रस्त्याचे नाव 'संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग'

मुलुंड झुलेलाल मंदिराजवळील चौकाचे नाव 'श्री झुलेलाल भगवान चौक'

मालाड (पश्चिम) येथील जलतरण तलावाचे नाव 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव'

चेंबूर, सांडू गार्डनजवळील रस्त्याचे नाव 'आचार्य श्री महाश्रवण मार्ग क्रमांक १७' असे असेल.

पवई जंक्शनला (चौकाला) 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक'

परळ, आर. एम. भट शाळेजवळील रस्त्याचे नाव 'परळची देवी मार्ग'

कुर्ला (पूर्व) येथील चौकाचे नाव 'गौतम साबळे चौक'

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Municipal Corporation meeting: Renaming dominates agenda after four years.

Web Summary : After four years, Mumbai's municipal meeting prioritizes renaming roads and squares. Out of 27 proposals, 20 are for renaming initiatives, overshadowing basic civic issues. A 'Tipu Sultan' road name proposal might spark controversy. Important renamings include Bappi Lahiri Marg and Atal Bihari Vajpayee Swimming Pool.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईभाजपाशिवसेनाकाँग्रेस