Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:43 IST2025-11-18T10:42:04+5:302025-11-18T10:43:26+5:30
Mumbai School Food Poisoning: शाळेच्या कॅन्टीनमध्ये चुकून कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्ल्याने घाटकोपर पश्चिमेतील केवीके या खासगी अनुदानित शाळेतील २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: शाळेच्या कॅन्टीनमध्ये चुकून कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्ल्याने घाटकोपर पश्चिमेतील केवीके या खासगी अनुदानित शाळेतील २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यानंतर शाळेने तत्काळ डॉक्टरांना बोलावून विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरू केले. दोन विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील समोसा खाल्ला. काही वेळातच त्यांच्या पोटात दुखून मळमळ सुरू झाली. ६ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. त्यानंतर शाळेच्या प्राचार्य रिमा डिसूझा यांनी शेजारच्या रमाबाई ठाकरे प्रसूतिगृहातील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टर शाळेत पोहोचले आणि विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरू केले. याबाबत पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्याचे टाळले. दरम्यान, इकरा जाफर नियाज सय्यद (११) आणि वैजा गुलाम हुसेन (१०) या दोघांवर राजावाडीत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर राजीव खान (११), आरुष खान (११) व अफजल शेख (११) यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जेवण बनवताना तेलात अनवधानाने कापूर पडला
जेवण बनवणाऱ्या देवडिया यांच्याकडून चुकून तेलात कापूर पडला. या तेलातील समोसा खाल्ल्यानेच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, अशी माहिती शाळेच्या प्राचार्या रिमा डिसूझा यांनी दिली. शाळेने तत्काळ पालिकेच्या डॉक्टरांना बोलावून विद्यार्थ्यांवर त्वरित उपचार सुरू केले. आता सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे, असे शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांनी सांगितले. तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र, शाळांनीही फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र हंगे म्हणाले.