"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:10 IST2025-12-12T10:10:06+5:302025-12-12T10:10:40+5:30
लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रक्रिया बदलली. आम्ही पहिली घरे देणार, तुम्ही तिथे शिफ्ट व्हा त्यानंतर झोपडपट्टी तोडू असं स्पष्ट सांगितले असंही प्रणव अदानी म्हणाले.

"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
मुंबई - धारावी पुनर्वसन प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा शहरी विकास प्रकल्प आहे. मागील ४० वर्षापासून धारावीचा विकास करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु काम पुढे सरकत नव्हते. परंतु आता सरकारने आंतरराष्ट्रीय निविदा काढली आणि त्यात अदानी ग्रुपची निवड झाली. धारावी प्रकल्पात जवळपास २ लाख घरे बनवण्यात येणार आहे अशी माहिती अदानी ग्रुपचे प्रणव अदानी यांनी दिली आहे. एका मुलाखतीत धारावी पुनर्वसन प्रकल्पावर प्रणव अदानींनी सविस्तर भाष्य केले.
प्रणव अदानी म्हणाले की, धारावी पुनर्वसन प्रकल्प हा दीर्घ काळासाठी खूप चांगले काम करेल, कारण हा मुंबई शहराच्या मध्यभागी असणारा सर्वात मोठा विकास प्रकल्प आहे. याठिकाणी २००० पूर्वी राहणाऱ्यांना त्याच ठिकाणी नवीन घर मिळेल आणि त्यानंतर राहायला आलेल्या लोकांचे मुंबईतच पुनर्वसन केले जाईल असं सरकारने स्पष्ट केले आहे. मी स्वत: धारावीत जाऊन आलो आहे. याठिकाणी लोकांशी बोललो. लोक आधीपेक्षा खूप आशावादी आहेत. सोशल मीडियामुळे त्यांना आसपास काय विकास होतोय हे माहिती आहे. मुंबई आणि देशाची इतकी प्रगती होत असताना तेदेखील ही संधी सोडणार नाहीत. त्यांनाही बदल हवाय यात शंका नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच धारावीतील लोकांना आज ३५० स्क्वेअर फूटचं घर मिळणार आहे. मुंबईतील प्रॉपर्टी दर जवळपास ३० हजार प्रतिस्क्वेअर फूट आहे. म्हणजे या घराची किंमत १ कोटीपर्यंत जाणार आहे आणि हे घर त्यांना मोफत मिळेल. मग त्यांना हा बदल का नको वाटेल? प्रत्येकाला सन्मानाने आयुष्य जगायचे आहे. आज धारावीतील अनेक परिसरात अत्यंत बिकट अवस्था आहे. याठिकाणी सर्वात मोठी समस्या विश्वासाची होती. याआधीही झोपडपट्टी पुनर्वसन झालेत, ज्यात लोकांना आधी ट्रांझिट कॅम्पमध्ये राहायला पाठवले आणि त्यानंतर त्यांना घरे दिली नाहीत. त्यामुळे लोक बेघर झालेत. त्यामुळे झोपडपट्टीतच राहू असं या लोकांना वाटते. लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रक्रिया बदलली. आम्ही पहिली घरे देणार, तुम्ही तिथे शिफ्ट व्हा त्यानंतर झोपडपट्टी तोडू असं स्पष्ट सांगितले असंही प्रणव अदानी म्हणाले.
धारावीचा विकास कसा होणार?
आम्ही धारावीत मल्टिमोडल कॉरिडोर विकसित करणार आहोत. त्याठिकाणी बस येतील, मेट्रो आणि लोकलही येईल. सर्वात चांगले रस्ते बनतील कारण आम्ही तिथे नवं शहर उभारत आहोत. धारावी मुंबईच्या मधोमध आहे. त्यासाठी या जागेचे महत्त्व आहे. इथे लॉजिटिक्स प्लॅनिंग केले तर संपूर्ण मुंबईत कुठेही जाता येईल. हे मल्टीमोडल नेटवर्क हाँगकाँगसारखे असेल. ज्याठिकाणी बेसमेंटपासून वरच्या स्तरापर्यंत सर्व काही गोष्टी कनेक्ट असतील. इथेही मेट्रोने थेट एअरपोर्ट कनेक्शन मिळेल. लोकल ट्रेनने दुसरीकडे सहज जाता येईल. आम्ही संपूर्ण प्लॅनिंग यासारखे तयार केले आहे असं प्रणव अदानी यांनी म्हटलं.
"मुंबईत कमीत कमी २-३ एअरपोर्ट हवेत"
जगातील बड्या शहरात अनेक एअरपोर्ट असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कमीत कमी २-३ एअरपोर्ट हवेत. नवी मुंबई विमानतळामुळे हवाई प्रवासाला आणखी वेग येईल. अमेरिकेसारख्या देशात एअर आणि ट्रेन ट्रॅव्हल सुविधा आणि किंमत एकसारखीच असते. विशेषत: जर वेळेवर बुकींग करायला हवे. जेव्हा नवी मुंबई एअरपोर्ट पूर्णपणे तयार होईल आणि सर्व विकासकामे पूर्ण होतील तेव्हा मुंबईतील दोन्ही विमानतळे चांगल्यारितीने काम करतील. महाराष्ट्रात जो विकास होत आहे त्यामुळे नवी मुंबईला पोहचण्यासाठी अर्ध्या तासाहून जास्त वेळ लागणार नाही असंही प्रणव अदानी यांनी सांगितले.