Kurla Best Bus Accident :कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरेला अटक केली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा आरोपी चालकाने केला आहे. मात्र ईलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. दुसरीकडे, या अपघातात अनेक निष्पाण नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये १९ वर्षीय तरुणीचाही समावेश असून कामाच्या पहिल्याच दिवशी तिला मृत्यू गाठल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
कुर्ला बस अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रात्री ९,४५ च्या सुमारास कोणी कामावर जात होतं तर कोणी घरी परतत होतं. मात्र त्याठिकाणी मृत्यू दबा धरुन बसला आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. या अपघातामध्ये ५५ वर्षीय कनीज फातिमा अन्सारी यांचा मृत्यू झाला असून त्या एका रुग्णालयात कामाला होत्या. सोमवारी त्यांची रात्रपाळी होती म्हणून त्या कामावर निघाल्या होत्या. मात्र त्यावेळी भरधाव बसने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुसरीकडे, १९ वर्षीय आफरीन शाह या तरुणीलासुद्धा आपला जीव गमवावा लागला आहे. आफरीनची कहाणी आणखीनच धक्कादायक असल्याचे समोर आली आहे. सोमवारी आफरीन शाहचा नोकरीचा पहिलाच दिवस होता आणि काम आटोपून ती रात्री घरी जात होती. मात्र घरी जात असतानाच बसरुपी काळाने तिच्यावर झडप घातली आणि तिचा मृत्यू झाला.
कनिज अंसारी, आफरीन शाह, अनम शेख, शिवम कश्यप, विजय गायकवाड, फारूक चौधरी अशी मृतांची नावे असून ४९ जण या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातानंतर बस चालकालाही स्थानिक पकडून बेदम चोप दिला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ बस चालक संजय मोरेला सुरक्षितस्थळी हलवलं. त्यानंतर रात्री उशिरा मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.