१८७ विकासकामे थांबविली; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कारवाई : ५०२ बांधकामांना नोटीस
By सीमा महांगडे | Updated: December 27, 2025 09:45 IST2025-12-27T09:44:33+5:302025-12-27T09:45:01+5:30
-सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : १ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान पालिकेकडून विविध वॉर्डात १८७ विकासक आणि ...

१८७ विकासकामे थांबविली; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कारवाई : ५०२ बांधकामांना नोटीस
-सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान पालिकेकडून विविध वॉर्डात १८७ विकासक आणि प्रकल्पांना वायुप्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काम थांबवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ५०२ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक नोटीस या वांद्रे, सांताक्रूझ, खार, कालिना या भागातील विकासक आणि प्रकल्पांना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत सध्या विविध प्राधिकरणे, पालिका, खासगी विकासक यांच्या अखत्यारीतील तब्बल ८ हजारांहून अधिक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. दरम्यान धूळ, धूर यामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत मुंबई महापालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी, क्रेडाई, एमसीएचआय, नरेडको यांनाही सूचना केल्या आहेत.
न्यायालयाचे ताशेरे; अखेर आली जाग
मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे. वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वॉर्ड स्तरावर भरारी पथके नेमली आहेत. या भरारी पथकाकडून बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
या सूचनांचे पालन आवश्यक
७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्र्याचे आच्छादन असावे.
एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे आच्छादन किंवा कापडांचे आच्छादन असावे.
बांधकामांना हिरवे कापड झाकून बंदिस्त करणे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असावी.
बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत.