विक्रीकर अधिकाऱ्याचा १७५ कोटींचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 09:33 AM2024-03-02T09:33:11+5:302024-03-02T09:33:19+5:30

एसीबीने अधिकाऱ्यासह १६ करदात्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

175 crore misappropriation by sales tax officer; Case filed by ACB | विक्रीकर अधिकाऱ्याचा १७५ कोटींचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल

विक्रीकर अधिकाऱ्याचा १७५ कोटींचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विक्रीकर अधिकाऱ्यानेच पदाचा गैरवापर करत, बनावट कागदपत्रांद्वारे भासवलेल्या १६ कंपन्यांना १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांचा करपरतावा मंजूर करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी एसीबीने अधिकाऱ्यासह १६ करदात्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन वस्तू व सेवा विभागाचे अधिकारी तसेच विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत अमित गिरीधर  लाळगे (वय ४४) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. लाळगेकडे घाटकोपर विभाग नोडल ११ चा पदभार असताना, ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. १६ करदात्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणांचे बनावट व खोटे भाडेकरारपत्र सादर करून जीएसटीएन कमांक प्राप्त केले. त्यानंतर या करदात्यांनी शासनाला कोणताही कर भरला नसतानाही एकूण १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांच्या करपरताव्यासाठी ३९ कर परतावे अर्ज सादर केले होते.

तपास सुरू...
लाळगेने या अर्जाबाबत कोणतीही शहानिशा केली नाही. तसेच हे करदाते बनावट असल्याचे जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीममध्ये दिसत असतानाही  अमित लाळगेने हे करपरतावे अर्ज मंजूर केले. १६ जणांशी संगनमताने अपात्र परतावा मंजूर करून शासनाची फसवणूक केली. ही बाब समोर येताच, एसीबीने लाळगेसह १६ करदात्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या कंपन्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: 175 crore misappropriation by sales tax officer; Case filed by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी