173 laborers sent to Dehradun by chartered plane! | 'सोनू' दा मुंडा... १७३ मजुरांना चार्टर्ड विमानाने पाठविले डेहराडूनला!

'सोनू' दा मुंडा... १७३ मजुरांना चार्टर्ड विमानाने पाठविले डेहराडूनला!

मजुरांचा आनंद महत्त्वाचा
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यावर अनेक मजूर गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, परराज्यातील मजुरांना गावी जाण्यासाठी पुरेशी सोय नसल्याने अनवाणी पायाने ते जात असल्याचे पाहून मन हेलावून गेले. त्यामुळे जे शक्य होते, ते करण्याचा प्रयत्न केला, असे सोनू सूद विनम्रपणे सांगतात.

मुंबई : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी कनवाळू दिलाचे अभिनेता सोनू सूद यांनी आणखी एक चार्टर्ड विमान बुक केले. एअर एशिया इंडिया या कंपनीच्या विमानाने १७३ स्थलांतरित मजूरांना मुंबईहून शनिवारी उत्तराखंड येथील डेहराडूनला पाठविण्यात आले.

याआधी केरळमध्ये अडकलेल्या १६७ स्थलांतरित मजुरांना ओडिशा येथे जाण्यासाठी सोनू सूद यांनी गेल्या आठवड्यात चार्टर्ड विमान बुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी मजूरांना उत्तराखंडला जाण्यासाठी विमानाची सोय केली. यातील अनेक मजुरांनी कधीही विमानप्रवास केलेला नव्हता. सोनू सूद यांनी सांगितले की, या विमान प्रवासामुळे स्थलांतरित मजुरांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी आणखी चार्टर्ड विमानांची सोय करण्याचा माझा विचार आहे.
यासंदर्भात एअर एशिया इंडिया या कंपनीच्या सेल्स विभागाचे प्रमुख अनुप मांजेश्वर यांनी सांगितले की, स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाºया चार्टर्ड विमानांना आम्ही ‘उम्मीद की उडान’ असे नाव दिले आहे. कोरोना साथीशी सारा देश लढत असताना स्थलांतरित मजुरांना विमानाने त्यांच्या राज्यात पोहोचविण्याची संधी एअर एशिया इंडिया कंपनीला मिळाली. हा क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. स्थलांतरित मजुरांसाठी आतापर्यंत अशी सहा चार्टर्ड विमाने एअर एशिया इंडियाने पाठविली आहेत.
या विमानांचे तिकीट दर तुलनेने कमी असतात.

अनेकांनी दिला मदतीचा हात
लॉकडाऊनच्या काळात विविध राज्यांत अडकलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी परतताना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले आहे. हे मजूर कधी परत येतात याकडे त्यांचे कुटुंबीय डोळे लावून बसलेले असतात. सोनू सूद यांनी सांगितले की, मजुरांनी आपल्या घरी लवकर पोहोचावे म्हणून त्यांना चार्टर्ड विमानाने पाठविण्याचा विचार मनात आला. या कामासाठी देशभरातून आम्हाला अनेक लोकांनी मदतीचा हात दिला.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 173 laborers sent to Dehradun by chartered plane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.