२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 07:30 IST2025-11-26T07:29:56+5:302025-11-26T07:30:33+5:30
मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा अद्यापही वाऱ्यावरच, सीएसएमटीवरून दररोज सुमारे ८ लाख जण प्रवास करतात. या ठिकाणी आरपीएफ आणि जीआरपीचे पथक परिसरात तैनात असले तरी प्रवाशांच्या बॅगा किंवा व्यक्तिगत तपासणीची कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने सुरक्षा धोके कायम आहेत.

२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) मुंबईतील इतर ठिकाणी २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे उलटूनही उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अद्यापही अपुरीच आहे. महत्त्वाच्या सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही. तर, बॅग तपासणीसाठी फक्त एकमेव स्कॅनर कार्यरत आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या या बेपर्वा वृत्तीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सीएसएमटीवरून दररोज सुमारे ८ लाख जण प्रवास करतात. या ठिकाणी आरपीएफ आणि जीआरपीचे पथक परिसरात तैनात असले तरी प्रवाशांच्या बॅगा किंवा व्यक्तिगत तपासणीची कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने सुरक्षा धोके कायम आहेत. प्रवाशांच्या मते, दिल्लीत झालेल्या अलीकडच्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस सुरक्षा वाढवली गेली होती; मात्र, त्यानंतर पुन्हा निष्काळजीपणा दिसून आला. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवर असलेले बॅगेज स्कॅनर गेल्या काही दिवसांपासून बंद असून, स्टेशनवर प्रवाशांची तपासणी होतच नाही. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती जागरूक आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन स्कॅनर लवकरच
मध्य रेल्वेने सीएसएमटीसह महत्त्वाच्या स्थानकांवर नवीन हाय-टेक बॅग स्कॅनर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सीएसएमटीवर एक स्कॅनर कार्यरत असून, पुढील पंधरवड्यात दोन नवीन मशीन बसणार आहेत. त्या प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांसाठी वापरल्या जातील व प्लॅटफॉर्म क्रमांक ८ ते १८ दरम्यान बसविण्यात येतील. दादर, कल्याण, एलटीटी, पनवेल आणि ठाणे स्थानकांवरही अशा प्रकारच्या प्रगत स्कॅनरची उभारणी करण्याची तयारी सुरू आहे. नव्या यंत्रणा ३२ प्रकारच्या धोकादायक वस्तू शोधण्यास सक्षम असतील. मात्र, बॉडी स्कॅनर बसविण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
दहशतवादाशी लढण्यासाठी मुंंबई पाेलिसांची सज्जता
देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी सतरा वर्षे पूर्ण होत आहे. पण कालानुरूप केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबई पोलिस अशा हल्ल्यांनर तोंड देण्यासाठी सज्ज आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
शहरावरील या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील एनएसजी कमांडोंप्रमाणेच शक्तिशाली अशा शीघ्रकृती दल आणि फोर्सवनची स्थापना करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचा सराव दररोज या पथकांकडून करण्यात येतो. तसेच मुंबई पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि यंत्रसामग्रीने सज्ज करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
दिल्लीनंतर मुंबईतही अलर्ट
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आहे. संवेदनशील ठिकाणी झिरो पार्किंग करत बेवारस वाहनांचा शोध घेत त्यांना हटवण्यात येत आहे. पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून केंद्रीय, राज्यातील अन्य तपास यंत्रणांशी समन्वय वाढवला आहे. किनाऱ्यांवरील व समुद्रातील पोलिस गस्तीमध्ये वेळोवेळी बदल करत तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर भर दिला आहे.
कोलमडलेले नियंत्रण कक्षही अद्ययावत बनले
२६/११ दरम्यान हजारो कॉल एकाच वेळी आल्यामुळे पोलिस नियंत्रण कक्ष कोलमडले होते. मात्र या हल्ल्यानंतर कोलमडलेले नियंत्रण कक्षही अद्ययावत बनले आहे. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी सर्व्हेलन्स व्हॅन देण्यात आली आहे. या व्हॅनमुळे शहरामध्ये कोणत्याची ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ही व्हॅन तेथे पाठविण्यात येते. या व्हॅनद्वारे तेथील परिस्थितीचे चित्रीकरण केले जाते.