मुंबई : नऊ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर 'माझं लेकरू गेलं' अशा शब्दात तिच्या आईने एकच हंबरडा फोडला आणि डॉक्टरही सुन्न झाले.
अंधेरी पूर्व परिसरात २ मार्च रोजी एमआयडीसीमध्ये ३० वर्षीय मित्राने पीडित मुलीवर पेट्रोल टाकून तिला जाळले होते. यात ती ६० टक्के भाजली होती. तिला जखमी अवस्थेत कूपर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तेथून तिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी म्हणजेच ११ मार्च रोजी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे 'माझी लेक बरी होईल' या आशेने तिची आई रुग्णालयात हेलपाटे मारत होती. अशा आईला असतानाच मुलीच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी तिला दिली.
'आरोपीला मृत्युदंड द्या'
'लोकमत'ने मुलीच्या आईला संपर्क केल्यावर, मी माझी मुलगी गमावली, असे त्या जड अंतःकरणाने सांगत होत्या. मी न्यायालय आणि पोलिसांना आवाहन करते की त्याला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, अशी मागणी करताना त्यांना रडू आवरत नव्हते.
आरोपीवर उपचार सुरू
पीडित मुलगी ही अंधेरी पूर्व परिसरात दोन बहिणी, भाऊ आणि पालकांसह राहत होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीडिता आणि आरोपी हे मित्र होते आणि ते वारंवार भेटत असत. मात्र मुलीचे पालक तिला त्याला भेटू नये म्हणून दबाव आणत होते. यामुळे तिने आरोपीशी सर्व संपर्क तोडला त्या रागात त्याने हा प्रकार केल्याचे मुलीच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. मुलीला जाळताना आरोपीचे दोन्ही हात भाजले असून त्याच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत.