दोन महिन्यांत १७ आगी, तरीही बेफिकिरीच; जय भवानी आग दुर्घटनेनंतरही मुंबईकर आगीबाबत निष्काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:35 IST2023-12-05T13:35:04+5:302023-12-05T13:35:56+5:30
ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात मुंबईत १७ आगी लागल्या असून, त्यात चार जण मरण पावले

दोन महिन्यांत १७ आगी, तरीही बेफिकिरीच; जय भवानी आग दुर्घटनेनंतरही मुंबईकर आगीबाबत निष्काळजी
मुंबई :
गोरेगावच्या जय भवानी इमारतीला ऑक्टोबरमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या आणि त्यात झालेल्या मनुष्यहानीच्या आठवणी ताज्या असताना, मुंबईकर मात्र आग प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात बेफिकीर असल्याचे चित्र समोर आले आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात मुंबईत १७ आगी लागल्या असून, त्यात चार जण मरण पावले, तर ३२ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अनेक इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा अकार्यक्षम असल्याचे अग्निशमन दलाला आढळून आले होते.
बहुतेक आगी सोसायटीत लागल्या आहेत. काही घटनांमध्ये रहिवाशांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. इमारतीच्या मोकळ्या जागेत, इलेक्ट्रिक केबिन असणाऱ्या ठिकाणी टाकाऊ वस्तू, जुने फर्निचर, वायरी कोंबून ठेवल्याचे आढळून आले होते, असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अनेक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नावापुरतीच असल्याचेही स्पष्ट झाले होते. ज्या ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित नव्हती त्या इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.