गुडन्यूज ! आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 06:30 IST2021-05-07T06:30:02+5:302021-05-07T06:30:36+5:30
यापूर्वी रुग्णसेवेशी निगडित ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीचा आग्रह मंत्रिमंडळ बैठकीत धरण्यात आला होता.

गुडन्यूज ! आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले.
यापूर्वी रुग्णसेवेशी निगडित ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीचा आग्रह मंत्रिमंडळ बैठकीत धरण्यात आला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्यात आला. आता गट क आणि ड संवर्गाची १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल.