Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हिट ॲण्ड रन’मध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, चांदिवली येथील घटना; अल्पवयीन ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:20 IST

मुंबई : चांदिवलीतील नहार अमृत शक्ती परिसरात रविवारी सायंकाळी कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ...

मुंबई : चांदिवलीतील नहार अमृत शक्ती परिसरात रविवारी सायंकाळी कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर १७ वर्षीय कारचालक (रा. दुबई) घटनास्थळावरून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा माग काढत त्याला ताब्यात घेतले. त्याला ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाने २७ मार्चपर्यंत डोंगरी येथील सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

  १५ मार्चला सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास नहार अमृत शक्ती रोडवरील मंगोलिया बिल्डिंग गेट क्रमांक २ जवळ हा अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला दहावीचा विद्यार्थी प्रतीक माने (१५) गंभीर जखमी झाला. दुचाकी त्याचा मोठा भाऊ सुमित माने चालवत होता.

प्रतीकची परीक्षा ६ एप्रिलपासून सुरू होणार होती. मात्र, मूळ गावी लग्न असल्याने दोघे भाऊ प्रवासासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते. नहार जंक्शनजवळ पोहोचताच कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर पडले. त्यात प्रतीकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर सुमितच्या पायाला दुखापत झाली.

मित्रावरही गुन्हा, केअर टेकरचीही चौकशीया प्रकरणात कार चालकाचा मित्र व एमबीबीएसचा विद्यार्थी मोहम्मद अनस मोहर्रमअल्ली खान याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. कार भाड्याने घेऊन ती अल्पवयीन मुलाला चालवण्यासाठी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या अटकेचीही प्रक्रिया सुरू आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कारचा मालक दुबईत राहतो आणि त्याचा केअरटेकरही कार भाड्याने देतो. खानने आपल्या कागदपत्रांद्वारे केअरटेकरकडून कार भाड्याने घेतली आणि ती आपल्या अल्पवयीन मित्राला चालवण्यासाठी दिली. संबंधित अल्पवयीन मुलगा ईदसाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. पोलिसांनी खानला नोटीस बजावली असून केअरटेकरचीही चौकशी केली जाणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hit-and-Run: 15-Year-Old Killed in Chandivali; Minor Detained

Web Summary : A 15-year-old died in Chandivali after being hit by a car driven by a 17-year-old. The minor fled but was caught. He's been sent to a juvenile home. The friend who rented the car is also booked; caretaker investigated.
टॅग्स :अपघातमृत्यू