तीन महिन्यांत १३३ मुलींवर अत्याचार, ३४२ जणी बेपत्ता; सुट्टीत खबरदारीच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:42 IST2025-04-19T16:42:02+5:302025-04-19T16:42:02+5:30
जवळच्यांकडूनच घात होत असल्याचे उघड

तीन महिन्यांत १३३ मुलींवर अत्याचार, ३४२ जणी बेपत्ता; सुट्टीत खबरदारीच्या सूचना
मुंबई : गेल्या तीन महिन्यात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी १३३ गुन्हे, तर अपहरणप्रकरणी ३४२ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक गुन्हे हे जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सुट्टयांमध्ये मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान महिलांसंबंधित १,७७४ गुन्हे नोंद झाले असून त्यातील १४४० गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींच्या लैगिक अत्याचाराच्या १३३ प्रकरणांचा समावेश असून त्यापैकी १२२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच अपहरणाच्या ३४२ गुन्ह्यांपैकी २७४ प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील लैगिक अत्याचाराचे ६०९ तर अपहरणाचे १,२२६ गुन्हे नोंदवण्यात आले होते.
यापूर्वीच्या घटना
शिक्षकाकडून अत्याचार
खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला राहत्या घरातून अटक केली.
वडीलच निघाला विकृत
दारूच्या नशेत वडिलांकडूनच १५ वर्षीय मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवलीत समोर आली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवत वडिलांना अटक केली आहे.
'सोशल हालचाली' ही पाहा!
आपला पाल्य सोशल मीडियावर, मोबाइलवर काय करतो? कुणाच्या संपर्कात आहे? यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील नको ते फोटो, माहिती समाज माध्यमांवर शेअर करण्याचे प्रकार घडू शकतात. त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो.
मुलांचे मित्र बनून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते. अनेकदा याच ओळखीतून जवळीक साधून लैगिक अत्याचार, फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहे.