Join us

उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातर्फे १३ कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 08:14 IST

Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाकडून रुग्णसेवेत गरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसाहाय्य केले जाते. या कक्षाकडून आठ महिन्यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाकडून रुग्णसेवेत गरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसाहाय्य केले जाते. या कक्षाकडून आठ महिन्यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जानेवारी ते ऑगस्टपर्यंत कक्षाच्या माध्यमातून ३२३ रुग्णांना मदत झाली आहे. त्यात हृदयरोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्रस्थापना शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर व सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

राज्यात ४६८ धर्मादाय रुग्णालये असून त्यामधील सुमारे १२ हजार खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरिता उपलब्ध आहेत. यामध्ये मुंबईतील कोकिळाबेन, एन. एन. रिलायन्स, पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आदी नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे. तेथे गरिबांना हमखास खाटा मिळतील याची काळजी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून घेतली जाते. दुर्बल घटकातील रुग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होण्याकरिता राज्यस्तरीय विशेष मदत कक्षासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहितीही कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र