सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 06:16 IST2025-08-12T06:15:50+5:302025-08-12T06:16:07+5:30

महेश दहिसर पूर्वच्या धारखाडी परिसरात राहत होता.

11 year old Govinda dies during practice Crime registered against team president | सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

मुंबई : दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरून कोसळल्याने दहिसरमध्ये रविवारी रात्री ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. महेश रमेश जाधव असे त्याचे नाव आहे. तो पथकासह सराव करताना पडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी नवतरुण मित्रमंडळ गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरनार याच्यावर सोमवारी गुन्हा दाखल केला.

महेश दहिसर पूर्वच्या धारखाडी परिसरात राहत होता. रविवारी रात्री ९:४५च्या सुमारास तो नवतरुण मित्र मंडळ पथकाबरोबर केतकी पाडा परिसरात दहीहंडी थर लावण्याचा सराव करीत होता. त्यावेळी तो सहाव्या थरावर चढत असताना तोल जाऊन जमिनीवर कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, महेश पाय घसरून पडला की यामागे काही घातपात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

सरावालाही हवी नियमावली 

हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी अशा मूलभूत सुरक्षा साधनांचा वापर न करता तज्ज्ञांच्या देखरेखीत असे प्रशिक्षण होणे आवश्यक असते. मात्र, यात हलगर्जीपणा केल्यावर असे अपघात घडून ते जिवावरही बेतू शकतात असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. त्यामुळे अशा सराव स्पर्धांसाठी कठोर नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: 11 year old Govinda dies during practice Crime registered against team president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.