11% of people up to eighteen year old people of depression | अठराव्या वर्षापर्यंतच्या ११% व्यक्ती नैराश्याच्या बळी
अठराव्या वर्षापर्यंतच्या ११% व्यक्ती नैराश्याच्या बळी

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात अठराव्या वर्षांपर्यंत ११ टक्के व्यक्ती नैराश्याच्या बळी जात असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. नकारात्मक शारीरिक प्रतिमा हे मानसिक आरोग्यापुढचे मोठे सामाजिक आव्हान असून, आता ग्रामीण व निमशहरी भागातही ही समस्या बळावते आहे. शहरी समाजाप्रमाणेच, ग्रामीण भागातही नकारात्मक शारीरिक प्रतिमांमुळे येणारा ताण ही सामाईक समस्या असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे .

मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताहाचा भाग म्हणून पोद्दार फाउंडेशनतर्फे राज्याच्या ग्रामीण व उपशहरी भागात खास कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळा कर्जत, पनवेल, मालाड आणि माटुंगा भागात पार पडल्या. याप्रसंगी, कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या बऱ्याच व्यक्तींना बॉडीशेमिंगमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे समुपदेशन व औषधोपचाराअंती डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

लोकांना या सामाजिक बदलाची जाणीव करून देण्यासाठी स्वत:हून ओढवून घेतलेल्या नकारात्मक शारीरिक प्रतिमांचे तोटे समजावण्यासाठी, अंगणवाड्या, समाजमंदिरे आणि समुदाय शाळांनीही जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्ये सहा दिवसीय मोहिमेचा भाग म्हणून मानसिक आरोग्य जागरूकता उपक्रमांतर्गत ताण व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यासाठी पोद्दार फाउंडेशनने युवक बिरादरीशी भागीदारी केली. मानसिक आरोग्याला धक्का पोहोचविणाऱ्या घटकांची ओळख करून घेऊन, त्यावर उपाय शोधण्यासाठी यावेळी संवादात्मक सत्रे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मानसिक आरोग्याच्या औषधोपचारांचा अभाव
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, साधारण ७.५ टक्के भारतीय मानसिक रोगांचे शिकार होतात व या रुग्णांना त्वरित उपचारांची आवश्यकता असते. दुर्दैवाने यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच व्यक्तींना मानसिक आजारांबद्दल माहिती असते आणि ते व्यवसायिक मदत घेतात.
देशातील विशेषत: सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित समाजगटातल्या लोकांना अद्यापही मानसिक आरोग्याबाबत माहिती नाही आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपयुक्त असे उपक्रम व पुढाकार जवळपास अस्तित्वातच नाही.
शहरी भागात मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ सहज उपलब्ध असले, तरीही ग्रामीण भागातल्या सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित समाजाला वैद्यकीय मदत मिळविणे आजही कठीण जाते. याहीपेक्षा वाईट म्हणजे, मानसिक आजारांभोवतीचे न्यूनगंड हे त्यांना वैद्यकीय
मदत घेण्यास परावृत्त करतात, हे अहवालातून समोर आले आहे.

सायलन्स तोडो मोहीम राबविणार...
नकारात्मक स्वयंप्रतिमा आणि किमान आत्मसन्मान यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होत असतो. ही समस्या सार्वजनिक व्यासपीठावर आणत असून, या समस्येला तोंड देण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरांतील लोकांना प्रोत्साहन देत आहोत. याकरिता, सायलन्स तोडो मोहीम राबविण्यात येणार आहे.
- डॉ. प्रकृती पोद्दार, व्यवस्थापकीय विश्वस्त, पोद्दार फाउंडेशन.


Web Title: 11% of people up to eighteen year old people of depression
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.