१०० तोळे सोने, ४ बीएचके फ्लॅट, तरीही थांबला नाही छळ! मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

By मनीषा म्हात्रे | Updated: January 24, 2026 09:19 IST2026-01-24T09:18:31+5:302026-01-24T09:19:03+5:30

२०१७ मध्ये कुटुंबीयांच्या संमतीने झाला होता विवाह

100 tola of gold 4 BHK flat still the harassment did not stop shocking incident happened in mumbai | १०० तोळे सोने, ४ बीएचके फ्लॅट, तरीही थांबला नाही छळ! मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

१०० तोळे सोने, ४ बीएचके फ्लॅट, तरीही थांबला नाही छळ! मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिक्षित, उच्चभ्रू आणि तथाकथित गर्भश्रीमंत कुटुंबांमध्येही हुंडा प्रथा किती खोलवर रुजलेली आहे, याचे धक्कादायक वास्तव उघड करणारा प्रकार पुन्हा एकदा मुंबईत समोर आला आहे. लग्नात सुमारे १०० तोळे सोने, ४० लाखांचा विवाह खर्च, पतीसाठी महागडे दागिने, त्यानंतरही दरमहा दीड लाख रुपये घरखर्च, परदेश भ्रमंतीसाठी आर्थिक मदत आणि ४ बीएचके फ्लॅटची मागणी पूर्ण करूनही शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ सुरूच राहिल्याचा गंभीर आरोप ३९ वर्षीय विवाहितेने केला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास करत आहे.

परेलची रहिवासी असलेल्या या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. वर्ष २०१७ मध्ये कुटुंबीयांच्या संमतीने विवाह झाल्यानंतर, सुरुवातीपासूनच पतीकडून अधिक पैशांची मागणी सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. लग्नात कमी सोने दिले, आणखी पैसे आण असा तगादा लावत वारंवार माहेरहून पैसे आणण्यास भाग पाडण्यात आले. तसेच तिच्या वडिलांकडून दरमहा १.५० लाख रुपये दिले जात होते, तेव्हाच संसार सुरळीत चालत असल्याचे तिने म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर मुलाच्या वाढत्या वयाचे कारण पुढे करत ४ बीएचके फ्लॅट खरेदी करून देण्याचा दबाव टाकण्यात आला. मागणी मान्य न झाल्यास मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. हा छळ थांबावा म्हणून तिच्या वडिलांनी आतापर्यंत धनादेशाद्वारे ३९ लाख रुपये आणि कोट्यवधी रुपये रोख दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

पतीचे एका अन्य महिलेशी संबंध

पतीचे एका अन्य महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. पत्नीने जाब विचारल्यावर तिला खुलेआम धमक्या देण्यात आल्या. संबंधित महिलेकडूनही शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार घडल्याचा आरोप आहे. अखेरीस छळाला कंटाळून विवाहितीने मुलासह माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.

प्रेयसीला दागिने गिफ्ट

घरातून डायमंड दागिने, १० किलो चांदी, महत्त्वाची कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक वस्तू गायब झाल्या. काही दागिने पतीने प्रेयसीला गिफ्ट दिल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले. पत्नीने पती व त्याच्या मैत्रिणीविरोधात शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ, हुंड्यासाठी दबाव आणि फसवणूक केल्याबाबत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

५२९ गुन्हे मुंबईत दाखल

गेल्या वर्षभरात हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळाचे ५२९ गुन्हे मुंबईत दाखल झाले. त्यापैकी ५०२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. याच हुंड्याच्या प्रथेला कंटाळून ८ जणींनी आयुष्य संपविले. तर ९ जणींच्या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार ठरली.

Web Title : सोना, फ्लैट के बावजूद दहेज उत्पीड़न: मुंबई में चौंकाने वाला मामला।

Web Summary : मुंबई की एक महिला का आरोप है कि सोना और फ्लैट सहित पर्याप्त उपहारों के बावजूद उसे दहेज के लिए प्रताड़ित किया गया। पति ने और पैसे की मांग की, उसे शारीरिक और मानसिक रूप से प्रताड़ित किया और उसका अफेयर था। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Dowry harassment persists despite gold, flat: Shocking Mumbai case.

Web Summary : Mumbai woman alleges dowry harassment despite substantial gifts, including gold and a flat. Husband demanded more money, subjected her to physical and mental abuse, and had an affair. Police are investigating the case.