मुंबईत दुहेरी हत्याकांडाची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि १० वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील कांदिवलीत हे दुहेरी हत्याकांड घडले आहे. आरोपीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. पण, पोलीस अखेर सत्यापर्यंत पोहोचले आणि आरोपीचे बिंग फुटले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिवशंकर दत्ता (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी पुष्पा दत्ता (वय ३६) आणि दहा वर्षाच्या मुलाची हत्या केली. आरोपी शिवशंकर दत्ताने आधी पोलिसांना सांगितले होते की, पत्नी आणि मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आरोपीच्या माहितीमुळेच पोलिसांना आला संशय
पत्नी आणि मुलाने आत्महत्या केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची पुन्हा चौकशी केली. पण, आरोपींकडून माहिती देताना विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
पोलिसांनी आरोपी शिवशंकर दत्ता याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. पत्नी पुष्पा हिचे अवैध संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे त्याने पत्नीची हत्या केली. पण, पत्नीची हत्या करताना त्याला १० वर्षाच्या मुलाने बघितले. त्यामुळे त्याने मुलाचाही गळा घोटला.
हत्येनंतर रचला आत्महत्येचा बनाव
पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने दोघांचे मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत छताला लटकावले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली.
दोघांच्या आत्महत्येबद्दल जेव्हा शिवशंकरची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्याने वेगवेगळी माहिती दिली. शिवशंकरकडून दिल्या जाणाऱ्या माहितीत विसंगती असल्याचे जाणवल्यानंतर पोलिसांना ही आत्महत्या नव्हे, हत्या असल्याचा संशय आला आणि तो संशय खरा ठरला.