‘हार्बर’ची १० रेल्वे स्थानके लवकरच मध्य रेल्वेकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:54 IST2025-10-13T13:51:45+5:302025-10-13T13:54:24+5:30
वाशी-पनवेल हार्बर मार्गावर दररोज सुमारे १२-१४ लाख प्रवासी प्रवास करतात. महत्त्वाच्या स्थानकांमध्ये हार्बर मार्गावरील बेलापूर, खारघर, जुईनगर, सानपाडा आणि ट्रान्स-हार्बरवरील घणसोली, ऐरोली, रबाळे आणि इतर स्थानके समाविष्ट आहेत.

‘हार्बर’ची १० रेल्वे स्थानके लवकरच मध्य रेल्वेकडे
मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान असलेल्या दहा स्थानकांचा ताबा रेल्वेकडे देण्याबाबत सिडको आणि रेल्वे प्रशासनात चर्चा सुरू आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी सिडकोने ही स्थानके उभारली होती. मात्र, त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबतच्या जबाबदारीवरून दोन्ही संस्थांमध्ये मतभेद आहेत. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, स्थानकांची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण झाल्यानंतरच ती नव्या स्वरूपात स्वीकारली जातील.
वाशी-पनवेल हार्बर मार्गावर दररोज सुमारे १२-१४ लाख प्रवासी प्रवास करतात. महत्त्वाच्या स्थानकांमध्ये हार्बर मार्गावरील बेलापूर, खारघर, जुईनगर, सानपाडा आणि ट्रान्स-हार्बरवरील घणसोली, ऐरोली, रबाळे आणि इतर स्थानके समाविष्ट आहेत.
आता या स्थानकांची जशीच्या तशी जबाबदारी घेण्यास सिडकोकडून रेल्वेला सांगण्यात आले आहे. परंतु, रेल्वे स्थानकात बांधलेल्या इमारतींचा समावेश आहे ज्या २०-२५ वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे या इमारतींची आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची करून ती नव्याने बांधलेल्या स्वरूपात
हस्तांतरित करण्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
वाशी-पनवेल मार्गावर असलेली स्थानके
वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल.
मध्य रेल्वेकडून स्थानके ताब्यात घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. चर्चेअंती या स्थानकांचा ताबा घेण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्मवर एक ना अनेक गैरसाेयी
प्रवाशांच्या मते, या स्थानकांची सध्याची अवस्था दयनीय आहे. प्लॅटफॉर्मवरील फरशी तुटलेल्या आहेत. भुयारी मार्ग आणि वायूविजनची स्थिती चांगली नाही. तर, प्रकाश आणि वीज व्यवस्थाही अपुरी आहे. त्यामुळे रेल्वेने स्थानके ताब्यात घेतल्यास त्यांची देखभाल आणि सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
वाशी-पनवेल आणि ठाणे-तुर्भे-सानपाडा मार्गावरील प्रवासासाठी प्रवाशांकडून नेहमीच्या तिकिटांबरोबरच अतिरिक्त अधिभार आकारला जातो. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिडकोला दरमहा सरासरी ५ कोटी रुपये अधिभार दिला जातो. एप्रिलपासून आतापर्यंतच २५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम सिडकोकडे जमा करण्यात आली आहे. तरीदेखील सिडकोकडून स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार कायम आहे.