Join us

दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 06:07 IST

मुंबईमध्ये रोजगारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. त्यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांची असते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत १० लाख ४१ हजार प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून २३ ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या १४१४ विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी मध्य रेल्वे मार्गावरून मुंबईतून ४९ हजार प्रवासी एका दिवसात गेले असून, गुरुवारीही ५० हजार प्रवासी आपापल्या गावी गेल्याचे ते म्हणाले. 

मुंबईमध्ये रोजगारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. त्यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांची असते. वर्षभर काम करून सण उत्सव काळामध्ये त्यांना पुन्हा त्यांच्या गावची ओढ लागते. त्यामुळे त्यांच्याकडून स्वस्त आणि जलद पर्याय म्हणून रेल्वेची निवड केली जाते. प्रवाशांची सुविधा व्हावी यासाठी भारतीय रेल्वेने यावर्षी १२,७७४ विशेष ट्रेनचे नियोजन केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

रेल्वे प्रशासनाने या वाढत्या गर्दी योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी रेल्वेने विशेष ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या असून, नियमित गाड्यांसह मध्य रेल्वेने १९९८  तर पश्चिम रेल्वेने १,२०० पेक्षा जास्त दुतर्फा विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. दिवाळी आणि छटपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने क्राउड मॅनेजमेंटची तयारी केली आहे.

प्रत्येक स्थानकात ४ हजार प्रवासी थांबण्याची क्षमता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे प्रवाशांसाठी तात्पुरते होल्डिंग एरिया उभारण्यात आले आहेत. प्रत्येक स्टेशनवर सुमारे ३ ते ४ हजार प्रवाशांना एकाच वेळी थांबण्याची सुविधा उपलब्ध केल्याचे अधिकारी म्हणाले. तसेच गर्दीचे योग्य नियोजन करण्याबरोबरच प्रवाशांना झटपट तिकीट मिळावे यासाठी मोबाईल यूटीएस मशीनचीही व्यवस्था उपलब्ध केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : 10.5 Lakh Passengers Travel to UP, Bihar for Diwali, Chhath

Web Summary : Over 10 lakh passengers traveled from Mumbai to UP and Bihar for Diwali and Chhath Puja. Railways ran 1414 special trips. Crowded stations have holding areas and mobile ticketing for convenience.
टॅग्स :भारतीय रेल्वेदिवाळी २०२५रेल्वेउत्तर प्रदेशबिहार