Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत हिट अँड रनमध्ये ध्रुमिल पटेलचा मृत्यू; पत्नीची प्रकृती चिंताजनक, मुलाच्या वडिलांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:03 IST

विद्याविहार येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ध्रुमिल पटेल यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Mumbai Accident: मुंबईतील विद्याविहार परिसरात ५ फेब्रुवारीच्या रात्री एका अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ध्रुमिल प्रेमजी पटेल (३३) या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या ध्रुमिलने रविवारी अखेरचा श्वास घेतला. या भीषण अपघातात त्यांची पत्नी मीनल पटेल (३२) या अद्याप गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

५ फेब्रुवारी रोजी रात्री ११:१५ च्या सुमारास ध्रुमिल आणि मीनल हे दांपत्य आपले प्लायवूडचे दुकान बंद करून स्कूटरवरून घाटकोपर येथील आपल्या घराकडे परतत होते. विद्याविहारमधील सोमैया कॉलेजजवळील तानसा पाईपलाईन रोडवरून जात असताना समोरून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही हवेत उडून रस्त्यावर आदळले.

१० दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

अपघातानंतर दोघांनाही तातडीने राजावाडी रुग्णालयात आणि त्यानंतर घाटकोपरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. ध्रुमिल यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना १० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी त्यांच्या शरीराने साथ सोडली आणि एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हरपला. त्यांची पत्नी मीनल यांच्या हातापायाची आणि पेल्विक बोनची अनेक शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

अल्पवयीन मुलाचा बेजबाबदारपणा

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, ती आलिशान कार एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत होता. या मुलाला गाडी चालवण्यास दिल्याबद्दल आणि निष्पाप जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल टिळक नगर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला कार चालवायला देणाऱ्या त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ध्रुमिल यांच्या मृत्यूनंतर आता या एफआयआरमध्ये हत्येशी संबंधित कलमे वाढवण्यात येणार आहेत.

परिसरात संताप

एका अल्पवयीन मुलाच्या आणि त्याच्या पालकांच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला, तर दुसरीकडे एक महिला मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे मुंबईत, विशेषतः घाटकोपर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता कारचा वेग आणि अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Hit-and-Run Kills Dhruvil Patel; Wife Critical, Father Booked

Web Summary : Dhruvil Patel died after being hit by a speeding car driven by a minor. His wife is critical. Police arrested the minor's father. The accident occurred in Vidyavihar, Mumbai.
टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीसअपघात