Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील ५ हजार विद्यार्थी हवालदिल; नीट परीक्षा रद्दमुळे प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:19 IST

या प्रकारामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट-यूजी २०२६ ही परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे अखेर रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी, दि. १२ रोजी हा मोठा निर्णय जाहीर केल्यामुळे राज्यातील सुमारे ५,३०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी सापडले. या प्रकारामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

नीट परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर काही ठिकाणी फुटल्याचे पुरावे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा पुन्हा घेण्याचा कठोर निर्णय घेतला. देशभरातील सुमारे २२.७९ लाख विद्यार्थ्यांप्रमाणेच गोव्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अनेक वर्षांची मेहनत घेतली. मात्र, आता ही परीक्षा पूर्णपणे रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी पडले आहे. 

त्यांच्यासमोर पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यंदा राज्यातून परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५,३०० च्या आसपास होती. गेल्यावर्षीच्या ५,०९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गोवा मेडिकल कॉलेजमधील मर्यादित जागांसाठी चुरस नेहमीच तीव्र असते.

आता परीक्षा रद्द झाल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठे मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून खासगी शिकवणी लावली होती. मात्र आता पुन्हा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा वेळ, मानसिक ताण यामुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

राष्ट्रीय स्तरावरील या मोठ्या गोंधळामुळे गोव्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे परीक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गोव्यातील निष्पाप विद्यार्थ्यांनाही या गोंधळाचा फटका बसला आहे. एनटीएने अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील अनिश्चितता वाढली आहे. प्रवेश प्रक्रिया किती लांबणीवर पडणार आणि शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे.

पेपरफुटीचे तीन शहरांशी कनेक्शन

नीट यूजी परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीची व्याप्ती देशभर पसरली आहे. त्याचे आता महाराष्ट्र कनेक्शनही पुढे आले आहे. या प्रकरणात लातूर, पुणे व नाशिकमध्ये खासगी क्लासेस व समुपदेशकांच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. सराव परीक्षेच्या नावाखाली नीट परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न दिल्याचे आता समोर आले आहे. अनेक नामांकित क्लासेसनी नीट परीक्षेचे प्रश्न विद्यार्थ्यांना दिले. त्यामध्ये लातूरमधील दोन, पुण्यातील एका क्लासने नीट परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Students Distressed: NEET Exam Cancellation Delays Admissions

Web Summary : NEET-UG 2024 exam cancellation due to paper leak leaves 5,300 Goa students uncertain. Re-exam poses challenges, especially for rural students facing financial strain. Paper leak's Maharashtra connection revealed with Latur, Pune, and Nashik involved.
टॅग्स :गोवानीट परीक्षानीट परीक्षा पेपर लीकशिक्षण