Join us  

Exclusive: 'झिम्मा 2' मध्ये सोनाली-मृण्मयी का नाहीत? हेमंत ढोमे म्हणाला, "खरं सांगतो त्यांची..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:27 AM

सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले झिम्मा २ मधून गायब असण्याचं खरं कारण काय?

सध्या सगळीकडेच 'झिम्मा 2' (Zimma 2) ची चर्चा आहे. 'मराठी पोरी दुनियेला दाखवती माज' या गाण्याची तर प्रचंड धूम आहे. झिम्मा २ चा ट्रेलर तर सगळ्यांनाच आवडलाय. रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वेचं सरप्राईज प्रेक्षकांना मिळालंय. मात्र सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आणि मृण्मयी गोडबोले (Mrunmayee Godbole) दुसऱ्या भागात का नाहीत असा प्रश्न सिनेरसिकांना पडला होता. आता याचं उत्तर स्वत: दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) दिलं आहे. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत हेमंत ढोमे म्हणाला, "खरं सांगतो मला एकतर पार्ट २ च करायचा नव्हता. सिक्वल करुया असं अजिबात डोक्यात नव्हतं. मी याचा विरोधच करत होतो. पण क्षितीने माझं मन बदललं. ती म्हणाली ही पात्र आता ३ वर्षांनी नक्की काय करत असतील. इंदूचं पोरांबरोबर जमलं असेल का? अरे इंदूची पंच्याहत्तरी येईल, तर दुसरीकडे कबीर काय असेल तर तो कसला इतक्यात लग्न करतोय तो तर फ्लर्टच करत असेल."

हेमंत पुढे म्हणाला, "तसं मृण्मयीचं जे रमा हे पात्र होतं त्यात गोष्टीच्या शेवटी आपण म्हणलो होतो की ती बाळासाठी प्रयत्न करत आहे. मग असं वाटलं की भाग २ जर प्रेक्षकांना आवडला तर भाग ३ मध्ये आता मूल झालंय तर पुढे काय हे असू शकतं. दुसरं म्हणजे सोनालीचं जे मैथिली पात्र आहे त्याचा शेवटच गोड झालेला आहे. उगाच ओढून ताणून काहीतरी अडचणी आणा हे काही योग्य नाही. कथेची गरज म्हणून आत्तापुरतं ही पात्र बाजूला ठेवूया असं ठरलं."

हेमंत ढोमेने मुलाखतीतून कुठेतरी 'झिम्मा 3'चीही हिंट दिली आहे. सध्या 'झिम्मा 2' २४ नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय. यामध्ये शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरु या सुद्धा दिसणार आहेत. तर सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, क्षिती जोग, सायली संजीव, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर ही आधीच्या भागातील पात्र असणारच आहेत. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी चित्रपटमराठी अभिनेता