Join us  

जयंतीच्या प्रमोशनसाठी तरुणाचा मुंबई ते नागपूर सायकलवरुन प्रवास, करतोय हटके प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 3:50 PM

१२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या "जयंती" या सिनेमाचं हटके प्रमोशन

सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवलं आहे. जगभरातल्या घडामोडी, बातम्या तसेच नव्या गोष्टी अगदी एका क्लिक वर आपल्याला समजतात पण आजही काही ठिकाणं अशी आहेत जिथे पारंपरिक पद्धतीच्या जाहिरातबाजीने प्रभाव अधिक प्रखरतेने पडताना आपण पाहतो. १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या "जयंती" या सिनेमाबद्दल काहीसं असच म्हणावं लागेल. चित्रपटाच्या नावावर आणि टिझर च्या प्रेमात असलेल्या एका युवकाने चक्क या चित्रपटाचं प्रोमोशन एक वेगळ्या अंदाजात करण्याची ईच्छा सिनेमाच्या दिग्दर्शकांसमोर ठेवली आणि त्याची ही ईच्छा ऐकून 'जयंती' सिनेमाची संपूर्ण टीम आवाक झाली.

शोएब बागवान असं या युवकाचे नाव आहे. तो मुंबई येथील रहिवासी असून एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये वर्कशॉप मॅनेजर या पदावर काम करत आहे.  सोशल मीडियाद्वारे नुकताच जारी करण्यात आलेल्या जयंतीच्या पोस्टर आणि टिझरने तसेच चित्रपटाच्या एकूण विषयाच्या प्रेमात असलेला हा तरुण आपणसुद्धा या चित्रपटाची प्रसिद्धी करावी हा विचार त्याच्या मनात आला. पूर्वी कोणत्याही चित्रपटाची, नाटकाची माहिती सांगण्यासाठी काही लोकं चालत, नंतर कालांतराने सायकल किंवा गाड्यांतून फिरत दवंडी देत त्या चित्रपटाबद्दल किंवा एखाद्या नाटकाबद्दल लोकांना माहिती द्यायचे आणि स्थानिक त्या ठरलेल्या वेळी एकत्र येऊन चित्रपट किंवा नाटक पहायचे. अगदी त्याचप्रमाणे शोएब दादर-चैत्यभूमी ते नागपूर-दीक्षाभूमी हा तब्बल ८३० किलोमीटर चे अंतर सायकल ने पार करून चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत ठरलेल्या ठिकाणांहून जात गावाच्या वेशीवर येत लोकांना याबद्दल सांगणार आहे. यासाठी शोएबने त्याच्या कामावरून तब्बल एक महिन्यांची सुट्टी घेतली आहे.

याबद्दल शोएब सांगतो , "जयंती जसं याचं नाव जितकं हटके आहे तितक्या हटके पद्धतीने याची प्रसिद्धीदेखील झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना या चित्रपटाबद्दल समजावं आणि एक चांगला विषय लोकांपर्यंत पोहचावा हे या सायकल राईडचं उद्दिष्ट आहे." याबद्दल आपले मत व्यक्त करताना दिग्दर्शक शैलेश नरवाडे सांगतात, "शोएब सारखे तरुण या चित्रपटाला प्रेक्षक म्हणून लाभले यातच सर्वकाही आलं. प्रदर्शनाआधीच आम्हाला सर्वच वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे."