Join us  

#worlddoctorsday या डॉक्टरांची वैद्यकशास्त्रासह कलाक्षेत्रातही भरारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 9:41 PM

वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले म्हणून फक्त रुग्ण, रुग्णालय यांच्या चक्रात न अडकता काही डॉक्टरांनी आपली कलाही जोपासली आहे.

पुणेवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले म्हणून फक्त रुग्ण, रुग्णालय यांच्या चक्रात न अडकता काही डॉक्टरांनी आपली कलाही जोपासली आहे. मुख्य म्हणजे कलेच्या क्षेत्रात चमकताना त्यांनी आपली वैद्यकीय क्षेत्राशी नाळ तुटू दिलेली नाही. आज साजऱ्या होणाऱ्या वर्ल्ड डॉक्टर डे निमित्त अशा काही डॉक्टरांची ही खास बाजू.

 

डॉ श्रीराम लागू :

महाराष्ट्रात डॉ श्रीराम लागू हे नाव सर्वपरिचित आहे. डॉ लागू यांचा आवाज आणि बोलण्याची पद्धत आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारीच आहे.  डॉ लागू प्रत्यक्षात  कान नाक घसा तज्ज्ञ आहेत. त्यांनी  १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा (टांझानिया) येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता . ९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता काम करण्यास सुरुवात केली.

 

डॉ मोहन आगाशे :

विनोदी आणि गंभीर भूमिकांमध्येही आपल्या कामाची छाप पडणारे डॉ मोहन आगाशे यांनी नुसती वैद्यकीय पदवीच घेतली नाही तर अनेक वर्ष अध्यपनही केले आहे. पुण्यातील बी जे महाविद्यालयात त्यांनी मानसशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. 

 

डॉ अमोल कोल्हे :

शिवरायांच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेले अमोल कोल्हे हे शिक्षणाने डॉक्टर आहेत. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 

 

डॉ निलेश साबळे :

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी मनांचा वेध घेणारे अभिनेते, लेखक, निवेदक निलेश साबळे यांनी आयुर्वेद शास्त्रात शिक्षण घेतले आहे. ते स्वतः एमएस पदवीधर आहेत. मात्र सध्या ते कामाच्या व्यस्ततेमुळे अभिनय क्षेत्राकडे अधिक लक्ष देत आहेत. 

 

डॉ संजीवकुमार पाटील :

डॉ संजीवकुमार पाटील हे पुण्यात भूलतज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तो मी नव्हेच, नटसम्राट, काका की काकू अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून गेल्या ३० वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत.  

 

डॉ आशुतोष जावडेकर :

युवा लेखक, साहित्यिक, संगीतकार म्हणून तरुणाईचे मन जाणणारे डॉ आशुतोष जावडेकर हे व्यवसायाने दंत चिकित्सक आहेत. त्यांनी युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवलं आहे.अतिशय तरल मनाचे लेखन करणारे जावडेकर तितक्याच तन्मयतेने नियमित दंतचिकित्साही करतात. 

 

डॉ सलील कुलकर्णी :

आयुष्यावर बोलू काही या अल्बममुळे घराघरात पोचलेले सलील कुलकर्णीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. सुमधुर गाण्याने तरुणाईला वेड लावणारे कुलकर्णी यांनी आयुर्वेदशास्त्रात पदवी घेतली आहे. 

टॅग्स :पुणेडॉक्टरवैद्यकीय