Join us

महिला या पुरुषांपेक्षा अव्वल आहेत

By admin | Updated: November 2, 2016 02:22 IST

एकविसाव्या शतकात वावरत असतानाही महिलांना दुय्यम स्थान दिले जाते.

- सतीश डोंगरेएकविसाव्या शतकात वावरत असतानाही महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. शहरी भागात जरी हे चित्र जाणवत नसले तरी, ग्रामीण भागात आजही हे प्रकषार्ने जाणवते. ‘चूल आणि मूल’ या पलीकडे महिलांना किंमतच दिली जात नाही. जेव्हा मला ग्रामीण भागात जाण्याचा योग आला, तेव्हा मला याची पदोपदी जाणीव झाली. त्यामुळे आजही महिला सशक्तीकरणासाठी चळवळ उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी म्युझिक हे पॉवरफुल माध्यम ठरू शकते, असे रोखठोक मत रॉकस्टार शाल्मली खोलगडे हिने व्यक्त केले. महिला सबलीकरणावर आधारित एका गाण्याला शाल्मलीने आवाज दिला असून, त्याच पार्श्वभूमीवर तिच्याशी साधलेला संवाद...‘महिला सबलीकरण’ या गाण्याविषयी काय सांगशील?- ‘महिला सबलीकरण’ हा विषय घेऊन तयार केलेले गीत काळानुरूप असून, महिलांना कमी लेखणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पाडणारे आहे. प्रभावी आणि प्रवाही कलाकृती असलेले हे गीत शिवलीला डांगे यांच्या लेखणीतून साकारले आहे, तर साहिल कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले आहे. खरं तर या विषयावर अधिक बोलणे गरजेचे आहे. कारण आजही ग्रामीण भागात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. आपल्या मूलभूत गरजांकरिता ग्रामीण भागातील महिलांना कशाप्रकारे झगडावे लागते, याविषयीचे वास्तव या गाण्यात शब्दबद्ध केले आहे. वास्तविक इथल्या स्त्रियांना आपल्या शक्तीस्थळांची आणि अंगभूत मूल्यांची जाणीव नसते. त्यांना त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव होण्यासाठीच हे गीत साकारले आहे. या गाण्यातून नक्कीच महिलांचे प्रबोधन होईल. कारण संगीत हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे, असे मला वाटते. शिवाय या गीताचे बोल माझ्या विचाराशी तंतोतंत जुळणारे आहेत. महिलांचे ग्रामीण भागातील वास्तव हे ऐकीव माहितीवर आधारित आहे की प्रत्यक्ष अनुभवलंयस?- माझे बालपण मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये गेले. याचा अर्थ मी ग्रामीण भागाशी जुळलेली नाही असा होत नाही. जेव्हा मी हरियाणा राज्यातील ‘हरमान’ या गावात गेले होते, तेव्हा मला तेथील पुरुषी मानसिकता लक्षात आली. त्याठिकाणी महिलांनी केवळ ‘चूल आणि मूल’ ऐवढ्यापुरतेच मर्यादित राहावे असा जणू काही फतवाच काढलेला होता. त्याठिकाणी एक महिला आॅटो रिक्षा चालवित होती. परंतु तिच्याकडे पुरुषांचा बघण्याचा दृष्टिकोन विचित्र होता. तिला सतत इतर आॅटो रिक्षा चालकांचे टोमणे ऐकावे लागत होते. दुसरा अनुभव सांगायचा झाल्यास, मुंबई ते वाघा बॉर्डर बाईकच्या प्रवासात आम्ही जेव्हा राजस्थान हायवेने जात होतो, तेव्हा ट्रकचालक आम्हाला हिणावत होते. मुली बाईक कशा चालवू शकतात? असे ते उपरोधिकपणे बोलायचे. हे दोन्ही अनुभव पुरुषी मानसिकता लक्षात आणून देणारे आहेत. तुझा मुंबई ते वाघा बॉर्डर बाईक प्रवास महिलांना प्रेरणादायी ठरला. या अनुभवाविषयी काय सांगशील?- अमेझिंग... या शब्दानेच या प्रवासाचे वर्णन करायला आवडेल. कारण या प्रवासादरम्यान मला जे अनुभव आले ते आयुष्याची शिदोरी बनले. एक महिला तेही बाईकने वाघा बॉर्डरपर्यंत प्रवास, हे सगळं काही आत्मविश्वास उंचावणारे आहे. या प्रवासामुळे माझे भरपूर कौतुक झाले. काही महिलांना माझा प्रवास प्रेरणादायी ठरला. मला एकच सांगायचे आहे की, जर इच्छाशक्ती असेल तर कुठलेही ध्येय तुम्ही गाठू शकता. माझा हा प्रवास आत्मविश्वासावर आधारित होता. तुझ्या अ‍ॅक्टिंग करिअरबाबत सर्वांना उत्सुकता आहे, तू कधी पडद्यावर झळकणार आहेस?- होय, मला अ‍ॅक्टिंग करायला खरोखरच आवडेल. एखादी चांगली भूमिका मिळाल्यास मी नक्कीच पुन्हा चित्रपटात काम करायचा विचार करेन. २००९ मध्ये मराठी चित्रपटात केलेली भूमिका ही अखेरची नसेल हे नक्की. मी अ‍ॅक्टिंगचे वर्कशॉप केले आहेत. माझे इंडस्ट्रीत कॉन्टॅक्टही आहेत, त्यामुळे भविष्यात संधी मिळाल्यास मी नक्कीच अ‍ॅक्टिंगचा विचार करणार. मात्र सध्या तरी मी म्युझिकवरच लक्ष केंद्रित केले आहे. दर्जेदार गीते गाण्यासाठी माझा सततचा प्रयत्न असतो. आगामी काळात नक्कीच काही चांगली गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. ‘बलम पिचकारी’ या सुपरहिट गाण्याने तुला ओळख निर्माण करून दिली, पुन्हा अशा एका गाण्याचा तुझा शोध सुरू आहे का?-येत्या काळात प्रेक्षकांना अशाप्रकारची गाणी ऐकण्याची संधी मिळेल, याची मला खात्री आहे. सध्या अशाच एका म्युझिक व्हिडीओवर माझे काम सुरू असून, या महिन्यात हा म्युझिक व्हिडीओ लॉँच केला जाण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त गाणी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ती भावतील यात शंका नाही.