औरंगाबाद : विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या जुन्या आठवणी-किस्से सोशल मीडियावर फिरू लागले. त्यांची अशीच एक संस्मरणीय आठवण ‘लोकमत’नेही जपली आहे.‘दीवानापन’ चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त २००१ साली विनोद खन्ना शहरात आले होते. अभिनेत्री दिया मिर्झाने चंदेरी दुनियेत पदार्पण केलेल्या या चित्रपटातील अवतार गिल, अर्जुन रामपाल, शरद सक्सेना आणि दिग्दर्शक आशू त्रिखा ही कलाकार मंडळी शहरात आठ दिवस वास्तव्यास होती. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विनोद खन्नांच्या बंगल्याचा सेट उभारण्यात आला होता. ‘लोकमत’चे तत्कालीन संचालक ऋषी दर्डा यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन खन्ना यांना लोकमत कार्यालयास भेट देण्याचे निमंत्रण दिले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ते स्वीकारले. तसेच अन्य सहकलाकारांनाही सोबत येण्यास राजी केले.त्यानुसार २४ मे २००१ रोजी विनोद खन्ना यांच्यासह ‘दीवानापन’ चित्रपटाची टीम लोकमत भवन येथे आली. आपल्या आवडत्या अभिनेत्यास पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. वर्धापन दिनानिमित्त ‘लोकमत’ने तेव्हा मराठवाडा व अहमदनगरसह नऊ जिल्ह्यांमध्ये सुविचार महाबंपर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या सामूहिक सोडतीचे पहिले बक्षीस या वेळी विनोद खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रतिभा बागूल यांनी तापडिया नगर येथील अलिशान फ्लॅटचे पहिले बक्षीस जिंकले होते. तत्कालीन ऊर्जा, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, ‘लोकमत’चे तत्कालीन संचालक ऋषी दर्डा, कविता खन्ना व जुगलकिशोर तापडिया यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. सखी मंच व टाइम्स क्लब सदस्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात बोलताना विनोद खन्ना म्हणाले होते की, ‘औरंगाबाद शहराने जे प्रेम दिले, ते कधीही न विसरण्यासारखे आहे. दर्डा परिवाराने आणि विशेष करून ऋषी दर्डा यांनी ज्या आत्मीयतेने येथे आम्हाला आमंत्रित केले, तसे प्रेम सहसा कुठे पाहावयास मिळत नाही.’ मिश्किल स्वभावाचा परिचय करून देत ते म्हणाले की, भविष्यात ‘लोकमत’ पुन्हा अशी स्पर्धा आयोजित करीत असल्यास आम्हाला सांगा. आम्हीही सहभागी होऊन बक्षीस जिंकू!महापौर बंगल्यावर भेट!२००१ साली विनोद खन्ना भाजपाचे गुरदासपूरचे खासदार होते. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर मुंबईला रवाना होण्याआधी त्यांनी महापौर बंगल्यावर जाऊन तत्कालीन महापौर डॉ. भागवत कराड व भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. लोकांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून राजकारणात आलो, असे त्यांनी सांगितले. पार्टीच्या विकासाकरिता काम करण्याचेही त्यांनी सांगितले. त्यांंच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी उसळली व ते विमानतळाकडे रवाना झाले.
..जेव्हा विनोद खन्नांनी दिले ‘लोकमत महाबंपर बक्षीस’
By admin | Updated: April 28, 2017 01:10 IST