Join us  

जया प्रदांच्या करिअरची अशीही सुरुवात, ३ मिनिटांच्या भूमिकेसाठी मिळाले होते केवळ इतके रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 5:34 PM

पहिल्यावहिल्या चित्रपटात जयाप्रदा यांना फक्त ३ मिनिटे इतकाच स्क्रीन टाईम मिळाला होता. मात्र काही मिनिटांच्या या परफॉर्मन्सनी अनेक दिग्दर्शक आणि रसिकांची मनं जिंकली.

आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर जयाप्रदा यांनी रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलं आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, हिंदी, बंगाली आणि मराठी चित्रपटसृष्टीत जयाप्रदा यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. जयाप्रदा यांनी आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले. या भूमिकांनी त्यांना अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला. मात्र अभिनय कारकिर्द सुरू करताना त्यांनाही अथक मेहनत करावी लागली. १९७४ साली तेलुगू चित्रपट ‘भूमी कोसम’मधून त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 

१९७९ साली रिलीज झालेल्या 'सरगम' चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. बालपणापासून जयाप्रदा यांनी अभिनयाला सुुवात केली होती. त्यांना पहिला चित्रपट मिळण्याचाही एक किस्सा आहे. जयाप्रदा १३ वर्षांच्या असताना त्यांनी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात एक डान्स परफॉर्मन्स सादर केला होता.

 

त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दिग्दर्शकाने जयाप्रदा यांना तेलुगू चित्रपट ‘भूमी कोसम’मधील ३ तीन मिनिटांचा डान्स नंबर ऑफर केला. ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी जयाप्रदा नर्व्हस होत्या. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना याबाबत प्रोत्साहन दिलं. त्यानंतर जयाप्रदा यांनी या डान्स नंबरची ऑफर स्वीकारली. या ३ मिनिटांच्या डान्ससाठी ‘भूमी कोसम’च्या दिग्दर्शकाने जयाप्रदा यांना दहा रुपये दिले होते. 

पहिल्यावहिल्या चित्रपटात जयाप्रदा यांना फक्त ३ मिनिटे इतकाच स्क्रीन टाईम मिळाला होता. मात्र काही मिनिटांच्या या परफॉर्मन्सनी अनेक दिग्दर्शक आणि रसिकांची मनं जिंकली. यानंतर जयाप्रदा यांना अन्क चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. वयाच्या १३ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर एंट्री मारणाऱ्या जयाप्रदा १७ वर्षांत बड्या स्टार बनल्या. एक चांगल्या अभिनेत्री असलेल्या जयाप्रदा या उत्तम नृत्यांगणाही आहेत. 

अष्टपैलू अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हिंदीत 'कामचोर', 'शराबी', 'मां','थानेदार', 'संजोग', 'मकसद', 'तोहफा', 'आज का अर्जुन', 'ऐलान-ए-जंग', 'सिंदूर', 'आखिरी रास्ता', 'गंगा जमुना सरस्वती' अशा चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. राजकारणात आल्यानंतरही त्या चित्रपटात सक्रीय राहिल्या.

 

त्यांनी सुरुवातीला १९९४ साली तेलुगू देसम पार्टी आणि त्यानंतर समाजवादी पक्षातून राजकारण केलं. चित्रपटांसह छोट्या पडद्यावरही जयाप्रदा आपल्या अभिनयाची जादू दाखवत असतात. परफेक्ट पती या मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवलीय.  

टॅग्स :जया प्रदा