Join us  

Aranyak: १२ नोव्हेंबरच्या रात्री काय झालं? रविना टंडनच्या रहस्यमय 'अरण्यक'चा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:26 AM

Aranyak: या सीरिजच्या माध्यमातून रविना पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करत आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री रविना टंडनच्या (raveena tandon) 'अरण्यक' (aranyak) या वेब सीरिजची  (web series) चर्चा रंगली आहे. या सीरिजच्या माध्यमातून रविना पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करत आहे. त्यामुळे रविनाला पहिल्यांदाच वेब सीरिजमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. विशेष म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता आता या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.  

नेटफ्लिक्सने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर 'अरण्यक'चा ट्रेलर प्रदर्शिक केला आहे. या ट्रेलरमध्ये रविना एका महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या रुपात पाहायला मिळत आहे. सोबतच ही सीरिज मिस्ट्री-थ्रिलर असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर एक रहस्यमयरित्या गुंतलेली केस सोडवताना रविना दिसत आहे.

विनय वायकुळ दिग्दर्शित या सीरिजची कथा सिरोना या पहाडी भागातील आहे. यात रविनाने कस्तुरी डोंगरा ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेता परमब्रत चटर्जी याने अंगद मलिक ही भूमिका वठवली आहे. या सीरिजची कथा रहस्यमयरित्या गायब झालेल्या तरुणीचा शोध घेण्याभोवती फिरते.

एक रहस्यमयरित्या गुंतलेली केस सोडवण्यासाठी कस्तुरी कित्येक महिने काम करत असते. मात्र, त्याच वेळी तिची बदली होते आणि तिच्या जागी अंगद मलिक (परमब्रत चटर्जी) हे नवीन पोलिस अधिकारी येतात. रविना सोडवत असलेल्या केसमध्ये एक मुलगी रहस्यमयरित्या अचानक गायब होते. विशेष म्हणजे कस्तुरी ही केस सोडवण्यासाठी तिचं अर्ध आयुष्य खर्ची घालते. परंतु, ऐन केसचा उलगडा होत असतानाच तिची ट्रान्सफर होते. मात्र, कस्तुरी ही केस सोड नाही. उलटपक्षी ती अंगदसोबत मिळून केस सोडवते, असं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, या सीरिजमध्ये रविनासोबत आशुतोष राणा, जाकिर हुसैन, मेघना मलिक हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज येत्या १० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ही सीरिज सुपरनॅच्युरल थ्रिलर असून या सीरिजची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोहन सिप्पीने केली आहे. 

टॅग्स :रवीना टंडनवेबसीरिजसेलिब्रिटीआशुतोष राणा