Join us  

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर! जिम सरभ, शेफाली शाह, वीर दासचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:19 AM

१४ श्रेणींमध्ये २० देशांच्या ५६ कलाकारांना नॉमिनेशन मिळालं आहे

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023 (International Emmy Award 2023) ची नुकतीच घोषणा झाली. यामध्ये हिंदी सिनेमातून शेफाली शाह (Shefali Shah) , वीर दास (Veer Das) आणि जिम सरभ (Jim Sarabh)यांना नामांकन मिळालं आहे. हिंदी सिनेसृष्टीचं नाव उंचावणारी ही गोष्ट आहे. सध्या या तिघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. भारतीय ओटीटी शोजसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. 

१४ श्रेणींमध्ये २० देशांच्या ५६ कलाकारांना नॉमिनेशन मिळालं आहे. जिम सरभला 'रॉकेट बॉय' वेबसिरीजसाठी बेस्ट परफॉर्मन्स बाय अॅन एक्टर' श्रेणीत नामांकन आहे. यामध्ये जिमसोबत स्पर्धेत अर्जेंटिनाचा गुस्तावो बासानी, युकेचा मार्टिन फ्रीमैन आणि स्वीडनचा जोनस कार्लसन यांनाही नामांकन आहे. 

अभिनेत्री शेफाली शाहने गेल्या काही वर्षात अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे वेबसिरीज 'दिल्ली क्राईम'. या वेबसिरीजचा दुसरा भागही प्रदर्शित झाला असून यातील भूमिकेसाठी शेफालीला 'बेस्ट परफॉर्मन्स बाय अॅन एक्ट्रेस' श्रेणीत नामांकन मिळालं आहे. या श्रेणीत शेफालीसोबत डेन्मार्कची कोनी नीलसन, यूकेची बिली पायपर, आणि मेक्सिकोची कार्ला सूजा या स्पर्धेत आहेत.

याशिवाय प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासला नेटफ्लिक्सवरील कॉमेडी शो 'वीर दास:लँडिंग' साठी नामांकित करण्यात आलं आहे. त्याच्यासोबत फ्रान्सचा के ले फ्लॅम्बो, अर्जेंटिनाचा के एल एनकारगाडो आणि यूकेचा लोकप्रिय कॉमेडी शो डेरी गर्ल्स सीजन 3 ला नॉमिनेशन मिळालं आहे.

२० नोव्हेंबर ला ' आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२३'चं आयोजन करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडवेबसीरिज