चित्रपटांपेक्षा मालिकांमधील खलनायकांची रीत वेगळी. चित्रपटातील खलनायक थेट वार करतात. मालिकांमध्ये मात्र कट रचणे, डाव टाकणे याला महत्त्व असते. पण, त्यातही काही वैशिष्ट्यांमुळे मालिकांमधील व्हिलन्स हिरो-हिरोईइनपेक्षा जास्त भाव खाऊन जातात. ‘तू तिथे मी’मधील तांबडेबाबा एवढा फेमस झाला, की त्याच्यामध्ये त्यातील मंजिरी आणि सत्यजित झाकोळून गेले. ताबंडेबाबा असणाऱ्या एपीसोडला अनेकदा जास्त टीआरपी मिळायचा. त्यामुळे मालिकेत हे पात्र काहीसे वाढविल्यासारखेही झाले. मालिकांमध्ये विशेष म्हणजे खलनायकी ढंगाच्या भूमिका पुरषांपेक्षा स्त्री पात्रेच अधिक निभावतात. त्यांची कट-कारस्थाने आणि लकबी यांमुळे अनेक व्हिलन्स घराघरांत चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत. ‘पुढचं पाऊल’ या गाजलेल्या मालिकेतील रूपालीच्या घरावर वर्चस्व ठेवण्यासाठी चाली चलणे अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. तिची डोळे फिरविण्याची स्टाईलही चांगलीच पॉप्युलर झाली. ‘असे हे कन्यादान’मधील किटूची जळकुकडी वृत्ती चर्चिली गेली. ‘प्रीती परी तुझवरी’ मधील शलाकाने मालमत्ता बळकाविल्याने अनेक भगिनींच्या चांगल्याच शिव्या खाल्ल्या. पुरुष कलावंतांमध्ये ‘रेशीमगाठी’मधील मेघनाच्या वडिलांचा ‘लक्ष असू द्या बाबाजी’ हा डायलॉग चांगलाच फेमस झाला. ‘दूर्वा’मधील विश्वासरावही त्याच्या गावठी बोलण्याने अािण डोळे फिरविण्याने चांगलाच फेमस झाला आहे. ‘होणार सून मी या घरची’मधील कधीही कोणाच्या कलेने न घेऊ शकणारी कला आणि टकला आपटे, ‘का रे दुरावा’तील वहिनी न शोभणारी शोभा... या खलनायकाची पात्रेच घरोघरी फेमस आहेत.
व्हिलन्सची हीरोगिरी
By admin | Updated: July 10, 2015 22:13 IST