Join us  

Viju Khote Death : ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेसाठी विजू खोटे यांना मिळाले होते इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:04 AM

‘शोले’ या अजरामर चित्रपटातील कालिया नामक पात्र अजरामर करणारे चतुरस्त्र अभिनेते विजू खोटे यांचे आज निधन झाले.

ठळक मुद्देविजू खोटे यांनी जवळ जवळ 300 हून अधिक चित्रपटांमध्ये कामे केलीत.

‘शोले’ या अजरामर चित्रपटातील कालिया नामक पात्र अजरामर करणारे चतुरस्त्र अभिनेते विजू खोटे यांचे आज निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. विजू यांनी मराठी व हिंदी सिनेमांत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेमुळे त्यांना अपार लोकप्रियता मिळाली. ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहे.  अबे ओ कालिया, तेरा क्या होगा?, असे गब्बर विचारतो तेव्हा कालिया घाबरत घाबरत, ‘कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं...’, असे म्हणतो. कालियाच्या तोंडचा हा संवाद प्रचंड गाजला. त्यामुळेच ‘शोले’चा उल्लेख झाला तेव्हा तेव्हा कालिया हमखास आठवला गेला. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, कालियाच्या या भूमिकेसाठी विजू यांना 2500 एवढे मानधन मिळाले होते. 

‘या मालक’ हा विजू यांचा पहिला डेब्यू सिनेमा होता. 1964 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा विजू यांचे वडील नंदू खोटे यांनी प्रोड्यूस केला होता. नंदू खोटे हे सायलेन्ट कॉमेडीसाठी ओळखले जात.चित्रपटांत येण्याआधी विजू स्वत:चे प्रिंटींग प्रेस चालवायचे. विजू यांना विनोदी भूमिका मनापासून आवडायच्या. त्याचमुळे आधी खलनायकाची भूमिका साकारणा-या विजू यांनी नंतर नंतर विनोदी भूमिका निवडल्या होत्या.

विजू खोटे यांनी जवळ जवळ 300 हून अधिक चित्रपटांमध्ये कामे केलीत. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अगदी लहान लहान भूमिका केल्यात. पण त्यांची प्रत्येक भूमिका ही लक्षात राहण्याजोगी होती. ‘अंदाज अपना अपना’ या 90 च्या दशकातला गाजलेल्या चित्रपटात त्यांनी साकारलेला रॉबर्टही फार गाजला. मराठी चित्रपटांचे नाव घ्यायचे झाले तर ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका अगदी लहान असेल पण तरी ही भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली.

टॅग्स :विजू खोटे