ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या विराट आणि अनुष्का न्यू-इअर सेलिब्रेशनसाठी उत्तराखंडमध्ये आहेत. येथील नरेंद्रनगरमधील हॉटेल ते दोघं थांबले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन, अनिल अंबानी, टीना अंबानी आणि भारतीय टीममधील क्रिकेटर या हॉटेलमध्ये गुरुवारी येण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. मात्र विराट आणि अनुष्का नव्या वर्षांत साखरपुडा करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. दरम्यान, बुधवारी अनुष्काने इंस्टाग्रामवर उत्तराखंडातील एक व्हिडीओदेखील शेअर केला होता. ज्यात ती मोराला खाद्य देताना दिसत आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, विराट कोहली उत्तरांखडचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे.
त्यामुळे या क्षणांचा राज्याचे मुख्यमंत्री हरीश रावत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उपयोग करत असल्याचेही म्हटले जात आहे. विराट आणि अनुष्का उत्तराखंडात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री हरीश रावत यांनी त्यांचे स्वागत करत त्यांची यात्रा संस्मरणीय होवो, असे ट्विटदेखील केले होते.