Join us  

व्ही. शांताराम यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने धन्य झालो!- भरत जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 5:55 AM

मी राजकमल स्टुडिओतील राजकमल चाळीतला मुलगा आहे.

मुंबई : मी राजकमल स्टुडिओतील राजकमल चाळीतला मुलगा आहे. व्ही. शांताराम आमच्या चाळीचे मालक होते. आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यामुळे मी धन्य झालो. आॅस्करवारी कधी आहे ते माहीत नाही, पण तिथले मान्यवर इथे येऊन मला पुरस्कार देतात, हे अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन भरत जाधव यांनी केले.राज्य शासनाच्या वतीने ५६ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री-निर्माती-दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आॅस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी आॅस्कर अ‍ॅकॅडमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात जाधव बोलत होते.दरम्यान, या वेळी वामन भोसले यांना राज कपूर जीवनगौरव व परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार प्रसाद लाड, सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अभिनेते विक्रम गोखले, अरुण नलावडे, मृणाल कुलकर्णी उपस्थित होते.।आॅस्कर अकादमीतर्फे उभारल्या जाणाऱ्या जागतिक सिनेमाच्या वस्तुसंग्रहालयाचे बांधकाम पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा उभारण्यासाठी राज्य शासन आग्रही आहे. तसेच आॅस्करचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी दिली.

टॅग्स :भरत जाधव