नवी दिल्ली - "अगले जनम मोहे बिटिया ही कीजो" या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाली आजही अनेकांच्या लक्षात आहे. अभिनेत्री रतन राजपूतने साकारलेली लालीची भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती. परंतु ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून मालिकाविश्वापासून दूर आहे. व्लॉग्सच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत अनेक घटना या शेअर करत असते. आपल्या एका लेटेस्ट व्लॉगमध्ये अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली आहे. सध्या त्याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
रतन राजपूतचे काही दिवसांपूर्वी शेतात लावणी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता अभिनेत्री तिच्या लेटेस्ट व्लॉगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रतनने आपण नवीन फोन घेतल्याचं सांगितलं. यासोबतच तिने तिच्यासोबत घडलेली भयंकर घटना सांगितली. रतनने दिल्लीत राहून पहिल्यांदा 4 हजारांचा नोकिया फोन विकत घेतला होता, तो तिचा पहिला फोन होता.
"एक दिवस मी मंडी हाऊसमध्ये नाटकाचा सराव करून परतत होते. आणि फोनवर माझ्या आईशी बोलत होते. तेव्हा एक मुलगा आला आणि माझा फोन हिसकावून घेऊ लागला. मी जोरजोरात ओरडू लागले पण कोणीही मला मदत करायला पुढे आलं नाही. लोक फक्त उभे राहून तमाशा पाहत होते. मी स्वतः त्या मुलाचा पाठलाग करू लागले. त्या सर्व घटनेदरम्यान मी मुख्य रस्त्यापासून फारच लांब निघून आले होते."
"मला एक मुलगा भेटला मी त्याच्याकडे मदत मागितली. त्यानंतर तो माझ्या हाताला धरुन मला ओढत एका जंगलाच्या दिशेने घेऊन जाऊ लागला आणि तुला तुझा मोबाईल मिळवून देतो चल असं एका वेगळ्याच उद्देशाने म्हणू लागला. मी त्याच्या तावडीतून निसटण्याचा बराच प्रयत्न करत होते. परंतु तो मला फरफटत घेऊन जात होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर मी स्वतः चा जीव वाचवून कशीबशी घरी पोहोचले" असं म्हणत रतनने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.