Join us  

मनीष पॉलला सगळ्या अटी-शर्ती मान्य...! सोशल मीडियावर पोस्ट लिहून मागितले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 2:56 PM

होय, एक पोस्ट टाकून एका टीव्ही अभिनेता व होस्टने काम मागितले आहे. त्याचे नाव मनीष पॉल. 

ठळक मुद्देमनीषच्या या पोस्टवर चाहत्यांच्या मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कधीकाळी सोशल मीडियावर काम मागणारी पोस्ट टाकली होती. त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली होती. आता अशीच एक पोस्ट टाकून एका टीव्ही अभिनेता व होस्टने काम मागितले आहे. त्याचे नाव मनीष पॉल. होय, मनीष पॉलने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून काम मागितले आहे. माझे अजिबात नखरे नाहीत, असे काम मागताना त्याने लिहिले आहे.मनीष पॉल हे टीव्ही इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. पण लॉकडाऊनच्या काळात सगळे काही ठप्प आहे. अशात मनीषने एकदम अनोखी पोस्ट लिहून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पोस्टमध्ये त्याने त्याच्या वेगवेगळ्या गेटमधील फोटोंचा कोलाज शेअर केला आहे़.सोबत अगदी ऑडिशनवेळी देतात तशी माहिती दिली आहे.त्याने लिहिलेय, ‘माझी उंची 6 फुट दीड इंच आहे. माझा रंग गोरा आहे़. मी एक अ‍ॅक्टर आहे. सोबत एक होस्टही. लॉकडाऊन संपल्यानंतर मी काम करू इच्छितो. मी सेटवर अगदी ठरलेल्या वेळी येईल. कमीत कमी लोक माझ्यासोबत असतील. मी 12 तास काम करायला तयार आहे. 1 तास अधिकही काम करण्याची माझी तयारी आहे. मी माझे जेवण घरून आणेल. माझा स्टाफही त्यांचे जेवण सोबत घेऊन येईल. मला माझ्या व्हॅनिटीत ना फ्रूट हवेत, ना बिस्किट. कृपया संपर्क करण्यासाठी संकोच करू नको. चित्रपटांसाठी, वेब शो, वेब सीरिज, रिअ‍ॅलिटी शो, होस्टिंग सगळ्यांसाठी मी तयार आहे. मुंडन करून होस्ट करण्याचीही माझी तयारी आहे.’

तूर्तास मनीषच्या या पोस्टवर चाहत्यांच्या मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत. भाई, सेक्रेड गेम्सच्या तिस-या सीझनमध्ये गणेश गायतोंडेची भूमिका मिळेल तुला, असे एका युजरने त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले आहे.तुम्हाला ठाऊक आहेच की, लॉकडाऊनमुळे बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्री सगळे काही ठप्प आहे. अशात अनेकांच्या हाताला काम नाही़ मनीषचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही, तूर्तास तरी हेच दिसतेय.

टॅग्स :मनीष पॉल