ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडच्या मोस्ट हॅण्डसम हिरोंपैकी एक असलेले प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचे आज निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाने आजारी होते. 1968 ते 2013 या 45 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत त्यांनी एकूण 141 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 1968 मध्ये पदार्पणातच त्यांना नायकाची भूमिका मिळाली नाही. सुरुवातीला सहाय्यक अभिनेता, खलनायक अशा भूमिका त्यांनी केल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांनी खलनायकाची भूमिका विशेष गाजली. अचानकमधील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांना दाद दिली.
1982 साली करीयरच्या शिखरावर असताना त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला रामराम करण्याचा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला. गुरु ओशो रजनीश यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अध्यात्माचे धडे गिरवले. पुन्हा पाचवर्षांनी कमबॅक करताना इन्साफ आणि सत्यमेव जयते हे दोन हिट चित्रपट दिले.