Join us  

मराठमोळ्या या अभिनेत्रीचं बालपण गेलं झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरात, आताही राहते भाड्याच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 6:00 AM

बरीच वर्षे सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करत असली तरी ही अभिनेत्री अजूनही भाड्याच्या घरात राहते.

चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करते व्याजा सकट, असा डायलॉग म्हणणारी ‘देवमाणूस’मधील चंदा असो वा ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat Jiv Rangla) या मालिकेतील  ठसकेबाज वहिनीसाहेब किंवा मग ‘रानबाजार’मधील करारी प्रेरणा पाटील.... तिने सगळ्या भूमिकेत अगदी जीव ओतला. आम्ही बोलतोय ते मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) हिच्याबद्दल. नुकतेच तिने एका मुलाखतीत तिच्या बालपणापासून आतापर्यंतच्या संघर्षाबद्दल सांगितले.

माधुरी पवार मुळची साताऱ्याची असून ती लहानाची मोठी तिथेच झाली. तिचे वडील घरांचे बांधकाम करायचे, त्यामुळे त्यांना काम मिळेल तिथे जावे लागायचे. शिक्षण घेता यावे म्हणून माधुरी आजीजवळ राहत होती. आजीसोबत पत्र्याच्या झोपडीत ती राहायची. तिथेच तिचे बालपण गेले. बरीच वर्षे सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करत असली तरी माधुरी अजूनही भाड्याच्या घरात राहते. 

नुकतेच तिने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या स्वप्नातील घराबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मी माझ्या आई-बाबांसाठी एक छोटसे घर घेतले आहे. परंतु माझे ड्रीम घर वेगळेच आहे. मला खूप मोठे नाही, पण चार खोल्यांचे घर असावे असे वाटते. त्यात स्वयंपाकघर, हॉल, माझी खोली आणि एक पाहुण्यांसाठी खोली असेल. मला कौलारू घरे खूप आवडतात. कोकणातल्या घरांसारखे घर मला हवे आहे. माझ्या घरात कोणत्याच सुखसोईंचा अभाव नसावा. बाहेरून साधे वाटत असले तरी घरात आल्यावर सर्व सोईसुविधा उपलब्ध असाव्या. माझ्या घराभोवती झाडे असावी, प्राणी असावे. मला सातारा खूप आवडते, त्यामुळे मी तिथेच घर बांधेन. याशिवाय मला कोकण फार आवडते. शाळेत असताना आपण उगवता सूर्य, टेकडी, एक नदी आणि तिथे असलेल्या घराचे चित्र काढायचो, अगदी तसेच माझ्या स्वप्नातले घर आहे.

वर्कफ्रंटबद्दल

 माधुरी पवार ही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली होती.  या मालिकेत तिने नंदिता वहिनींची भूमिका साकारली होती. आधी ही भूमिका धनश्री काडगावकरने साकारली होती. पण तिने मालिकेला रामराम ठोकल्यावर माधुरीने नंदिता वहिनीच्या भूमिकेत मालिकेत दमदार एंट्री घेतली होती. यानंतर ‘देवमाणूस’ या मालिकेत ती चंदाच्या भूमिकेत दिसली होती. ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही तिची मालिका देखील चांगलीच गाजली होती.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगला