Join us

‘कंडिशन्स अप्लाय’च्या टीमची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:57 IST

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘कंडिशन्स अप्लाय’ चित्रपटाच्या टीमने लोकमत आॅफिसला दिलेल्या भेटीदरम्यान चित्रपटाविषयी खुलासा केला.

लोकमत आॅफिसला भेट!लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘कंडिशन्स अप्लाय’ चित्रपटाच्या टीमने लोकमत आॅफिसला दिलेल्या भेटीदरम्यान चित्रपटाविषयी खुलासा केला. या चित्रपटात प्रथमच सुबोध भावे आणि दीप्ती देवी हे एकत्र दिसणार आहेत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या आगळ्यावेगळ्या विषयावर आधारित या चित्रपटातील दीप्ती व त्याच्या भूमिकेविषयी बोलताना सुबोध सांगतो, एकलकोंडा, अबोल, लग्नाविषयी फारसे चांगले मत नसलेल्या, रुक्ष असणाऱ्या अभयच्या आयुष्यात स्वतंत्र विचारसरणीची, जबाबदाऱ्या नको असणारी, निर्भिडपणे वागणारी पण स्वत:चे लहानपण जपणारी स्वरा येते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि ‘कंडिशन्स अप्लाय’ घडतो.या चित्रपटासाठी अविनाश विश्वजित यांच्याकडून अतिशय उत्तम व पटकथेला साजेशी संगीतनिर्मिती घडली आहे. या चित्रपटासाठी त्यांनी एकूण चार गाणी दिली आहेत. त्यापैकी आनंद शिंदे यांच्या आवाजातील एक हिंदी गाणेही आहे. त्याचबरोबर उत्तम अभिनय, संगीत आणि सद्यस्थितीवर आधारित विषय या तीन गोष्टींचा मिलाफ या चित्रपटातून पाहायला मिळेल, असे चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितले. या चित्रपटाचे निर्माते डॉ. संदेश म्हात्रे चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की, जरी ‘कंडिशन्स अप्लाय’ हा लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित बोल्ड विषय असला तरी भारतीय संस्कृतीला कुठेही धक्का बसत नाही. चांगला विषय आणि बदल या चित्रपटातून वेगळ्या प्रकारे मांडला आहे. अर्थातच, सुज्ञ मराठी प्रेक्षक याची निश्चितच दखल घेतील, याची खात्री आहे. सुबोधसारख्या अनुभवी कलाकाराबरोबर काम करताना आलेले अनुभव दीप्तीने ‘लोकमत’ला दिलेल्या भेटीदरम्यान शेअर केले. ती सांगते, या आगळ्यावेगळ्या कथानकाच्या पार्श्वभूमीवर सुबोधबरोबर काम करताना प्रथम दडपण आले होते. पण सुबोध माझा जुना मित्र आहे. तो फार मोकळ्या मनाचा आणि फ्रेंडली आहे, त्यामुळे सेटवर फार छान वातावरणनिर्मिती होत गेली आणि बघता बघता चित्रपटपूर्णही झाला.संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन प्रस्तुत ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ या चित्रपटातून एका प्रेमात पडलेल्या जोडप्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. प्रेमाच्या नव्या कल्पना, नात्यांची नवी परिमाणे, मानवी संबंधातील नवीनप्रवाह याविषयीचा वेध घेणारा हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.