Join us  

महाराष्ट्राची पहिली अप्सरा ठरली साताऱ्याची माधुरी पवार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:33 PM

मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा आणि पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी या ५ जणींनी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारली.

ठळक मुद्देइतर चार जणींना मात देत साताऱ्याची माधुरी पवारने बाजी मारली आणि ती बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा. महागुरू सचिन पिळगांवकर यांनी महाअप्सरांबरोबर या कार्यक्रमाचे परीक्षण केले.

तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरांमधून केवळ पाच अप्सरा या कार्यक्रमात टिकल्या आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा आणि पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी या ५ जणींनी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पारंपरिक लावणीचा साज आणि अस्सल मातीची लावणी सादर करत अनेक परफॉर्मन्स मधून बंदा रुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारने अख्ख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले. 

लावणीचा अस्सल ठसा जपून वेगवेगळ्या फॉर्म मधून लावणी मंचावर सादर करताना ऑल राउंडर ही पदवी मिळवणारी ऐश्वर्या काळेने या मंचाला एका वेगळ्या उंचीवर नेले. वयाने लहान असल्याने सगळ्यांचे लाड करून घेणारी मालवणची लाडूबाईने तिच्या परफॉर्मन्स मधून सगळ्यांनाच खुश केले. गश्मीर महाजनी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी या सगळ्याच कलाकारांना आपल्यासोबत परफॉर्म करण्यासाठी जिने भुरळ घातली अशा ग्लॅमरस किन्नरी दामाने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले. वडिलांचा नृत्याचा वसा चालवून प्रत्येक परफॉर्मन्स एकदम परफेक्ट करणारी श्वेता परदेशी. या पाचही जणींची लावणीची जुगलबंदीने महा-अंतिम फेरीची चुरस वाढली होती. मात्र इतर चार जणींना मात देत साताऱ्याची माधुरी पवारने बाजी मारली आणि ती बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा. महागुरू सचिन पिळगांवकर यांनी महाअप्सरांबरोबर या कार्यक्रमाचे परीक्षण केले.

या अप्सरांमध्ये मुख्य गोष्ट अशी की, एकमेकींसमोर स्पर्धक म्हणून उभ्या ठाकलेल्या असतानाही, सगळ्यांच्यात असलेला जिव्हाळा मात्र एखाद्या कुटुंबाप्रमाणे होता. प्रेम, आपुलकी आणि खिलाडूवृत्तीने या पाचही अप्सरांनी अंतिम सोहळ्यात त्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. महाअंतिम सोहळयाचे मुख्य आकर्षण टॉप ५ अप्सरांची जुगलबंदी होतंच... पण त्याच बरोबर महाअप्सरांनी म्हणजेच सोनाली कुलकर्णी, दीपाली सय्यद आणि सुरेख पुणेकर यांनीही स्पेशल नृत्य सादर करत प्रेक्षकांना एक सुखद धक्का दिला. 

 

टॅग्स :अप्सरा आलीसुरेखा पुणेकरसोनाली कुलकर्णी