तेरी मेरी यारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:34 IST
Exculsive - प्राजक्ता चिटणीस अभिनेते, अभिनेत्री म्हटले की, त्यांच्यात स्पर्धा ही असणारच ...
तेरी मेरी यारी...
Exculsive - प्राजक्ता चिटणीस अभिनेते, अभिनेत्री म्हटले की, त्यांच्यात स्पर्धा ही असणारच असेच सामान्यांना वाटत असते. पण अनेक कलाकार खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्रमैत्रीण असतात. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने या कलाकारांनी आपल्या लाडक्या मित्रमैत्रिणीबद्दल सांगितलेल्या या आठवणी... आदिनाथ कोठारे-वैभव तत्त्ववादीआदिनाथ आणि वैभवची मैत्री ही गेली चार-पाच वर्षांपासून आहे. दोघेही त्यांच्या कामात नेहमीच व्यग्र असतात. पण तरीही ते एकमेकांना भेटायला आवर्जून वेळ काढतात. आदिनाथ सांगतो, आॅल द बेस्ट या नाटकाच्यावेळी माझी आणि वैभवची ओळख झाली. आमच्या दोघांचे ट्युनिंग कधी जमले हे आम्हाला दोघांनाही कळले नाही. वैभवमध्ये आणि माझ्यामध्ये खूप गोष्टी सारख्या आहेत, आम्ही दोघेही खूप खादाड आहोत, याचमुळे बहुधा आमचे पटत असावे असे मला वाटते. तर वैभव सांगतो, "आदिनाथ हा फिल्म बॅकराऊंड असलेल्या कुटुंबातून आलेला आहे. महेश कोठारे यांसारख्या प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शकांचा मुलगा अाहे. तरीही तो खूप जमिनीवर आहे. त्याची ही गोष्ट मला प्रचंड आवडते. आदिनाथशिवाय माझा भाऊ आणि माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र हे माझे खूप चांगले मित्र आहेत." स्मिता तांबे-अमितराज-रेशम टिपणीसस्मिता तांबेची गायक अमितराज आणि रेशम टिपणीस यांच्यासोबत खूपच चांगली मैत्री आहे. स्मिता सांगते, "अनेक वर्षांपासून सविता ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. पण सध्या ती अमेरिकेत असल्याने आमच्या खूपच कमी भेटीगाठी होतात. इंडस्ट्रीत अमितराज आणि रेशम टिपणीस माझे खूप चांगले फ्रेंडस आहेत. अमितराज आणि माझी मैत्री सात-आठ वर्षांपासूनची आहे. 72 मैल एक प्रवास या चित्रपटाच्यावेळी आमची मैत्री अधिक घट्ट झाली. आम्ही दोघेही नेहमीच एकमेकांच्या कामाचा आदर करतो. अमितप्रमाणेच रेशम ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. राजीव पाटील या माझ्या मित्राच्या निधनानंतर मी खूप खचले होते. पण त्यावेळात मला रेशमने खूप सांभाळले." अमृता सुभाष - कादंबरी कदमअमृता सुभाष आणि कादंबरीने कुंदन शहा यांच्या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर त्या दोघी अवघाची संसार या मालिकेत झळकल्या. त्यांच्या मैत्रीविषयी अमृता सांगते, "अवघाची संसार या मालिकेत कादंबरी ही माझ्या लहान बहिणीची भूमिका साकारत होती. आता तर ती मला माझ्या बहिणीसारखीच आहे. अवघाची संसार या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी काही महिने मी आजारी होती. मला धड चालताही येत नव्हते. त्यावेळी आमचे चित्रीकरण मढ आयलंडला असायचे. आम्ही दोघी जेट्टीने जायचो. त्यावेळी एखाद्या लहान मुलाची आपण ज्याप्रकारे काळजी घेतो, तशी माझी काळजी कादंबरी घेत असे. मी अनेक गोष्टीत तिचा सल्ला घेते. मी कपडे काय घालू हे तर मी अनेकवेळा तिला विचारते. मिफ्ताला मी घातलेल्या कपड्यांचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. त्या कपड्यांची निवड तिनेच केली होती. ती स्वत: एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही माझ्यासाठी अनेकवेळा फॅशन डिझायनरची भूमिका बजावते. तसेच आम्हाला दोघींनाही वाचनाची आवड असल्याने आम्ही एकमेकींना चांगली पुस्तकंही सुचवत असतो." संजय जाधव - हर्षदा खानविलकर - अंकुश चौधरीसंजय जाधव यांचे हर्षदा खानविलकर, अंकुश चौधरी हे खूपच चांगले फ्रेंडस आहेत. या तिघांची मैत्री गेली 16 वर्षं आहे. या मैत्रीविषयी संजय सांगतात, "आभाळमाया या मालिकेच्यावेळी आमची तिघांची भेट झाली. ही मालिका आमच्या तिघांच्याही करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेपासून आजपर्यंत आमच्या मैत्रीत काहीही फरक पडलेला नाही. आम्ही तिघे कामात व्यग्र असल्यास आम्हाला कित्येक महिने एकमेकांना भेटायलाही मिळत नाही. पण भेटल्यानंतर आपण इतके दिवस भेटलो नाही असे आम्हाला कधीच वाटत नाही."